Sugarcane Farmers Protest | ऊस दर आंदोलनामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल; प्रश्न तातडीने सोडवून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी

Sugarcane Farmers Protest |
किणी : शिवसेना ठाकरे गटाचे विजय देवणे, नामदेव गिरी, साताप्पा भवान आदींनी येऊन ऊस दर आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.
Published on: 
Updated on: 

पेठवडगाव : किणी टोल नाक्यावरील चक्काजाममुळे पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे; मात्र आता या पर्यायी मार्गांवरही आंदोलनाची धग पोहोचली आहे. सांगली जिल्ह्यातील बलवडी येथेही शेतकऱ्यांनी वाहतूक रोखल्याने वाहनधारकांची मोठी कोंडी झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवास करणारे नागरिक, खासगी वाहने तसेच मालवाहतूक करणारी वाहने अडकून पडली आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून ऊस दराचा प्रश्न तातडीने सोडवून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

अरुण दुधवडकर यांची आंदोलनस्थळी भेट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार बुधवारी दुपारी पक्षाचे उपनेते अरुण दुधवडकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. त्यांच्यासोबत कोल्हापूर जिल्हा सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख नामदेव गिरी, जिल्हा उपप्रमुख साताप्पा भवान, तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, बाळासाहेब पाटील, रवी निंबाळकर, संदीप दबडे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेनेच्या वतीने आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला. गुरुवारपासून शिवसैनिक प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. शासनाने दोन दिवसांत ऊस दराचा तिढा सोडविला नाही, तर गनिमी काव्याने कारखानदारांना सळो की पळो करून सोडू, असा इशारा शिवसैनिकांनी दिला.

आंदोलनकर्त्यांच्या भोजनासाठी मदतीचा ओघ

आंदोलनकर्त्यांच्या भोजनासाठी परिसरातील गावांमधून मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू आहे. सुमारे एक लाख पत्रावळ्या, डाळ-तांदळाची शेकडो पोती, तेलाचे डबे आणि भाजीपाला जमा झाला आहे. किणी, घुणकी, भादोले यांसह परिसरातील गावांमधून ग्रामस्थ भाकरी आणि चपात्या आणून देत आहेत. लोकसहभागातून आंदोलनस्थळी सामूहिक भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे.