

आशिष शिंदे
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांनी उसाच्या शेतजमिनीत कार्बन साठवण्याची क्षमता असल्याचे सिद्ध केले आहे. ‘कूल फार्म टूल’ या साधनाचा वापर करून करण्यात आलेल्या संशोधनात जिल्ह्यातील उसाच्या शेतजमिनीतील मातीत कार्बन साठवता येऊ शकतो, हे समोर आले आहे. कोल्हापूर आणि परिसरातील जमिनीत तब्बल 18 लाख टनांपेक्षा अधिक कार्बन जमा आहे. जमिनीत जास्त सेंद्रिय कार्बन असल्यामुळे कोल्हापूरच्या मातीला नैसर्गिक खत मिळत असून शहरे व गावांतील प्रदूषणाचे प्रमाण घटण्याबरोबरच हवामान बदल रोखण्यासही हे घटक मदत करू शकतील.
शेतीमध्ये नवनव्या तंत्राचा प्रयोग वाढल्याने शेतीमधून हरित वायू उत्सर्जन वाढले आहे. यामुळे कार्बन उत्सर्जनातही भर पडली आहे. मात्र, या अभ्यासात 15 वेगवेगळ्या ऊसशेतीच्या ठिकाणांवरून मातीचे 75 नमुने घेण्यात आले. त्यांचे वैज्ञानिक पद्धतीने विश्लेषण केल्यानंतर, कोल्हापूर आणि परिसरातील जमिनीत तब्बल 18 लाख टनांपेक्षा अधिक कार्बनसाठा असल्याचे निष्पन्न झाले. कार्बन साठवणीची ही प्रक्रिया शेतीतून होणारे हरित वायू व कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी मदत होऊ शकते, असा संशोधकांचा दावा आहे.
जमिनीत अधिक प्रमाणात सेंद्रिय कार्बन असल्याने मातीत सुपीकता टिकून राहते, मातीला नैसर्गिक खत मिळते, तसेच उत्पादनात स्थिरता येते. याशिवाय, वायुमंडलातील अतिरिक्त कार्बन डायऑक्साईड जमिनीत शोषला जात असल्यामुळे शहरांमधील व गावांमधील प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासही मदत होऊ शकते. हवामान बदल थोपवण्यासाठी हा मार्ग स्थानिक पातळीवर परिणामकारक ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
जास्त सेंद्रिय कार्बन असल्यामुळे मातीला नैसर्गिक खत मिळते. सेंद्रिय कार्बनमुळे मातीचे कण चिकटून राहतात, त्यामुळे माती भुसभुशीत राहते. कार्बनयुक्त माती जास्त पाणी शोषून ठेवू शकते. तसेच, जमिनीत सूक्ष्मजीवांची वाढ होते. हे सूक्ष्मजीव मातीला उपयुक्त पोषकद्रव्ये तयार करतात आणि पिकांची वाढ करतात.
‘कूल फार्म टूल’ (सीएफटी) म्हणजे एक आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त ऑनलाईन कॅल्क्युलेटर किंवा सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आहे. याचा वापर शेतकर्यांना, संशोधकांना आणि अन्न उत्पादन करणार्या कंपन्यांना हवामान बदलाचा शेतीवर होणारा परिणाम मोजण्यासाठी केला जातो. शेतात घेतल्या जाणार्या विविध पिकांमधून उत्सर्जित होणारा कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड यांची माहिती मिळते. मातीत किती प्रमाणात कार्बन साठला आहे, भविष्यात किती साठवला जाऊ शकतो, हेदेखील समजते.