

जयसिंगपूर : राज्य शासनाच्या मंत्रिमंडळ समितीने केंद्र सरकारच्या सूचनेनुसार चालू वर्षाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. `शासनाने शेतकऱ्यांना प्रतिटन किमान ५०० रुपये अनुदान जाहीर न केल्यास राज्यात १५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करू देणार नाही`, असा इशारा त्यांनी दिला आहे.
पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, देशात साखरेचा तुटवडा असल्याचे भासवून केंद्र सरकारची दिशाभूल करण्यात आली आहे. वास्तविक पाहता नोव्हेंबरपर्यंत पुरेल इतका साखरेचा साठा देशात शिल्लक आहे. ऑक्टोबरमध्ये गाळप सुरू केल्यास उसातील साखरेचा उतारा (रिकव्हरी) अवघा ८ ते ९ टक्केच मिळेल. यामुळे उसाचे वजन व रिकव्हरी घटून शेतकऱ्यांच्या पुढील वर्षाच्या एफआरपीवर प्रतिकूल परिणाम होईल. १५ डिसेंबरनंतरच थंडी वाढून साखरेची रिकव्हरी वाढते. लवकर गाळप सुरू केल्यास देशात १५ ते २० लाख टन साखरेचे उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. मूठभर कारखानदार व व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांवर हा निर्णय लादला जात असून, या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील व टोकाचा संघर्ष होईल, असा इशारा शेट्टी यांनी दिला.