

राजेंद्र दा. पाटील
कौलव : राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम उत्तरार्धाकडे झुकला असून, 202 कारखान्यांनी 6 कोटी 31 लाख टन उसाचे गाळप करून इथेनॉलकडे वळवलेली साखर वगळता 56 लाख टन साखर उत्पादित केली आहे. सरासरी साखर उतारा 8.87 टक्के आहे. उतार्यात सहकारी साखर कारखाने मोठा भाऊ ठरले असून, खासगीची उतार्यातील पिछेहाट ऊस उत्पादकांची चिंता वाढवणारी ठरली आहे.
दरवर्षी कर्नाटकातील गळीत हंगाम लवकर सुरू होतो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील साखर कारखाने दि. 1 नोव्हेंबरपासूनच सुरू करण्यात आले आहेत. यावर्षी राज्यात गाळपासाठी साडेदहा कोटी टन ऊस उपलब्ध होऊन 96 लाख टन साखर उत्पादित होईल, असा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर कारखान्याचा गळीत हंगाम 100 ते 120 दिवस चालतील, अशी शक्यता आहे दि. 7 जानेवारीपर्यंत राज्यातील कारखान्याचा हंगाम निम्म्यावर आला आहे. राज्यातील सहकारी कारखान्यांच्या तुलनेत खासगी कारखान्यांचा घटलेला उतारा ऊस उत्पादकांना आतबट्ट्यात आणणारा ठरणार त्याचबरोबर साखर उद्योगाला आत्मचिंतन करायला लावणारीदेखील ठरणार आहे.
राज्यातील केवळ कोल्हापूर विभागाचा सरासरी उतारा 10.45 टक्के असून, त्या पाठोपाठ पुणे विभागाचा उतारा 9.13 टक्के आहे. सर्व आठ विभागांचा विचार करता कोल्हापूर, पुणे विभाग वगळता सर्वच विभागांचा उतारा नऊ टक्क्यांपेक्षा खाली आहे. राज्यातील विभागवार सहकारी व खासगी कारखान्यांचा सरासरी साखर उतारा पुढील प्रमाणे आहे.
उतार्यात कोल्हापूरच भारी!
कोल्हापूर,सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर हे जिल्हे शुगर बेल्ट म्हणून ओळखले जातात. याच विभागात ऊस उत्पादनासह सरासरी साखर उतारा चांगला असतो. मात्र, यंदाच्या हंगामात केवळ कोल्हापूर, सांगली या दोन जिल्ह्यांचा उतारा दहा टक्क्यांपेक्षा अधिक व सातारा जिल्ह्याचा उतारा 9.53 टक्के आहे. कोल्हापूरने 10.63 टक्के एवढा राज्यात विक्रमी उतारा राखला आहे.
‘एफआरपी’ला दणका!
केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने यावर्षी उसाला पहिल्या सव्वा दहा टक्क्यांसाठी प्रतिटन 3,550 रुपये व पुढील प्रत्येक टक्क्यासाठी 346 रुपये दर जाहीर केला आहे. साडेनऊ टक्के उतार्यासाठी 3,290 रुपये ‘एफआरपी’ आहे. सहकारी व खासगी कारखान्यांच्या उतार्यात किमान 1.14 टक्क्याचा फरक पाहिला, तर टनामागे किमान 360 रुपयांचा दणका बसणार आहे. त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होणार आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांपेक्षा अन्य जिल्ह्यांत ऊस दर कमी मिळण्यामागे हेच कारण ठरत आहे.