

कोल्हापूर ः भारतीय साखर कारखानदारीत गाळप हंगामाचे सूप वाजण्यास सुरुवात झाली आहे. यंदाच्या हंगामात सहभागी झालेल्या देशातील 533 साखर कारखान्यांपैकी 186 कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे. काही कारखान्यांकडे गाळपासाठी जेमतेम ऊस शिल्लक राहिला आहे. यामुळे एप्रिलच्या पूर्वार्धातच हंगामाचे सूप वाजेल, असे अंदाज आहे. या हंगामादरम्यान 28 फेब्रुवारीअखेर 219.95 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन नोंदविण्यात आले असून गतवर्षीच्या तुलनेत उत्पादनातील घसरण 13.64 टक्क्यांवर आहे, तर साखर उत्पादन 34.75 लाख मेट्रिक टनाने घसरले आहे.
देशाच्या साखर कारखानदारीत प्रतिवर्षी देशांतर्गत उत्पादनापेक्षा अधिक साखर निर्मिती होते. यामुळे साखर निर्यातीला आणि पर्यायाने उत्पादकांची देयके अदा करण्यास मोठी मदत होते. यंदा मात्र देशांतर्गत अपेक्षित 285 लाख मेट्रिक टन साखर वापराच्या तुलनेत साखरेचे उत्पादन 265 लाख मेट्रिक टनावर थांबेल, असा अंदाज आहे. यामुळे वापर आणि उत्पादनातील 20 लाख मेट्रिक टनाची घट भागविण्यासाठी प्रथमच देशातील शिल्लक साठ्याला हात घालावा लागणार आहे. तसेच हंगामाच्या प्रारंभीच्या काळातील साखरेसाठी आवश्यक बफर स्टॉक लक्षात घेतला, तर निर्यातीच्या संधी पूर्णपणे मावळण्याचीच शक्यता अधिक आहे.
भारतात साखर हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. तसेच सर्वाधिक पाणी खाणारे पीक म्हणूनही त्याची ओळख आहे. या पार्श्वभूमीवर काही वर्षांपूर्वी उसाच्या लागवडीवर निर्बंध आणण्याची चर्चा सुरू झाली होती. समन्यायी पाणी वाटप या भूमिकेला उचलून धरून उसाच्या लागवड क्षेत्रावर नियंत्रण आणावे, असा एक मोठा विचारप्रवाह सुरू होता. परंतु, गेल्या काही वर्षांत साखर उद्योगाला इथेनॉल निर्मितीची मोठी जोड मिळाली. शिवाय, निर्यात बाजारातही भारतीय साखरेने आपला जम बसविल्यामुळे उसाच्या दरासाठी आणि थकीत बिलांसाठी कारखाने व साखर आयुक्तालयावर येणार्या मोर्चांची संख्या थंडावली होती. टनाला 3 हजार 500 रुपयांपर्यंत भाव मिळू लागल्याने शेतकरी उसाच्या लागवडीकडे पुन्हा वळू लागला. परंतु, त्याचबरोबर देशातील इंधनावर खर्ची पडणार्या परकीय चलनाला रोखण्यासाठी केंद्राने पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट वाढविले आणि समाधानकारक आधारभूत दरही देण्यास सुरुवात केली. यामुळे उपलब्ध उसापैकी इथेनॉलकडे वळणारा ऊस मोठ्या प्रमाणात वाढला आहे. चालूवर्षीही सुमारे 45 लाख मेट्रिक टन साखर इथेनॉलकडे वळविली जाईल, असा अंदाज आहे.
इथेनॉलच्या वाढत्या मागणीमुळे साखर उत्पादनात घट होत आहे. यामुळे आता इथेनॉल निर्मिती व देशांतर्गत साखर वापराच्या तुलनेत उपलब्धता निर्माण करण्यासाठी उसाचे लागवड क्षेत्र आणि दरहेक्टरी उत्पादन वाढविण्याचे मोठे आव्हान कारखानदारी, केंद्र व राज्य सरकारपुढे आहे. त्यासाठी सर्वप्रथम अन्य पिकांच्या पाण्याच्या उपलब्धतेला धक्का न लावता उसासाठी पाण्याचे नियोजन करावे लागेल. या आघाडीवर जर भारत मागे पडला, तर इंधनावरील परकीय चलनाची बचत होताना जगातील दुसर्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश म्हणून ओळखल्या जाणार्या भारताला देशांतर्गत वापरासाठी साखर आयातीचे धोरण तयार करावे लागेल, अशी स्थिती आहे.