

कोल्हापूर : उसाचा दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेने गुरुवारी आयोजित ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्यात दिला. शाहू स्मारक भवन येथे झालेल्या या मेळाव्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून सात ठराव मंजूर करण्यात आले.
किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन क्षीरसागर म्हणाले, सरकारचे निर्णय शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक ठरत आहेत. भांडवलदार विरुद्ध शेतकरी आणि कामगार असा संघर्ष उभा राहिला आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या जात नसल्याने शेतमालाला अपेक्षित हमीभाव मिळत नाही. विविध मार्गांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. दुष्काळाचे निकष ठरविताना आणेवारीऐवजी उपग्रहाच्या आधारे निर्णय घेणे शेतीच्या दृष्टीने धोकादायक आहे.
गिरीश फोंडे म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाच्या प्रश्नावर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठी चळवळ उभी करून सरकारला अलाईनमेंट बदलण्यास भाग पाडले आहे. मात्र, हा लढा अद्याप संपलेला नाही. राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळी गुलाल उधळूनच या लढ्याचा शेवट करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी करावा. यावेळी दिलीप पवार, ज्योतीराम घोडके, संतोष पवार, कॅप्टन उत्तम पाटील, सदाशिव निकम, विक्रांत पाटील, भगवान पाटील, रमेश चौगुले, युवराज पाटील, मुकुंद पाटील, मनीषा मोघे, शिवाजी कांबळे, जंबुकुमार चौगुले यांची भाषणे झाली. शेतजमीन वाचविण्यासाठी झालेल्या विविध आंदोलनांतील सहभागी शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक दिनकर सूर्यवंशी यांनी केले. संदीप जाधव यांनी सूत्रसंचालन केले. वाय. एन. पाटील यांनी आभार मानले.
परिषदेतील ठराव
उसाचा दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू नका, उसाला प्रतिटन सहा हजार पाचशे रुपये दर द्या, शक्तिपीठ महामार्ग रद्द करून एक लाख कोटी रुपये दुष्काळग्रस्तांना द्या, कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत दुष्काळ जाहीर करा, शेतीसाठी दिवसा आठ तास वीज द्या, आदींसह सुमारे दहा ठराव करण्यात आले.