

कोल्हापूर : साखर उद्योगाचे अभ्यासक आणि सहकार क्षेत्रातील मार्गदर्शक परशुराम गोविंद ऊर्फ पी. जी. मेढे (वय 78, रा. शहाजी वसाहत, टिंबर मार्केट) यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, बहीण, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने साखर उद्योगातील अनुभवी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
मेढे यांनी जिल्ह्यातील राजाराम, कुंभी-कासारी व भोगावती साखर कारखान्यांमध्ये कार्यकारी संचालक म्हणून काम केले होते. व्यवस्थापन कौशल्य, तांत्रिक जाण आणि उद्योगातील जटिल बाबींचे सखोल आकलन, यामुळे साखर उद्योगातील विश्वासार्ह तज्ज्ञ अशी त्यांची ओळख होती. साखर उद्योगातील आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास ही त्यांची जमेची बाजू होती. जगभरातील उत्पादन पद्धती, बाजारातील चढ-उतार, प्रक्रिया तंत्रज्ञान, तसेच बदलत्या धोरणांचा ऊस व साखर उद्योगावर होणारा प्रभाव, या सर्व विषयांवर त्यांनी सातत्याने अभ्यास करून मार्गदर्शन केले. सहकार क्षेत्रातील विविध संस्थांकडून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
उसापासून साखरेपर्यंतचा प्रवास अधिक कार्यक्षम, वैज्ञानिक आणि नियोजनबद्ध कसा व्हावा, याबाबत त्यांचे मार्गदर्शन अनेक कारखान्यांसाठी दिशादर्शक ठरले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, ऊर्जा बचत, उत्पादन क्षमता वाढ, उपउत्पादनांचे व्यवस्थापन, बाजारपेठेतील संधी यासारख्या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने अभ्यासपूर्ण लिखाण केले. माध्यमातून त्यांनी साखर उद्योगाच्या विविध समस्या, आव्हाने, उपाय यावर प्रभावी लेखन करून उद्योगातील धोरण निर्मात्यांना व व्यवस्थापकांना मार्गदर्शन केले. उद्योगाशी संबंधित अनेक संस्थांमध्ये ते साखरतज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. मेढे यांच्या निधनाने साखर सहकार क्षेत्रातील एक जाणकार, अभ्यासू आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.