

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाची मुख्य प्रशासकीय इमारत... सकाळी दहाची वेळ... कर्मचारी, अधिकारी यांची ये-जा... अचानक विद्यापीठातील एक महिला कर्मचारी मुख्य इमारतीत प्रवेश करत असताना इमारतीच्या भिंतीवरील मधमाश्यांनी अचानक त्या महिला कर्मचार्यावर हल्ला केला अन् प्रशासनाची धावपळ उडाली. महिला कर्मचार्याला वाचवण्याचा प्रयत्न करणार्या तिच्या पतीसह विद्यापीठातील आणखी तीन कर्मचार्यांना मधमाश्यांनी हल्ला करून जखमी केले. दहा-पंधरा मिनिटांच्या थराराने विद्यापीठातील मंगळवारची सकाळ भीतीच्या वातावरणात गेली.
विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या पिछाडीस मधमाश्यांचे पोळ बसले आहे. मंगळवारी सकाळी प्रशासकीय कर्मचारी मुख्य इमारतीत प्रवेश करत असताना अचानक मधमाश्यांचे पोळ उठले. मधमाश्यांनी एका महिला कर्मचार्यावर हल्ला केला. यावेळी तेथे उपस्थित महिलेच्या पतीसह दोन सुरक्षा रक्षक व एका कर्मचार्याने महिलेला वाचवण्यासाठी धाव घेतली. यात मधमाश्यांनी उर्वरित चौघांनाही चावा घेऊन जखमी केले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कुलसचिवांसह विद्यापीठातील उपस्थित सर्वच कर्मचार्यांनी खिडक्यांचे पडदे टाकून संबंधित महिला व इतर कर्मचार्यांना मधमाश्यांपासून वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांना तत्काळ विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील एकास जास्त मधमाश्या चावल्याने पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सोनचाफ्याची फुले व इतर सुगंधी गोष्टी मधमाश्यांना आकर्षित करतात. हल्ला झाला त्यावेळी संबंधित कर्मचारी महिलेच्या हातात सोनचाफा होता, असे प्रत्यक्षदर्शीर्ंनी सांगितले. सोनचाफ्याची फुले हातात असल्यानेच मधमाश्यांनी संबंधित महिलेवर हल्ला केल्याचे समजते.