कोल्हापूर : दसरा महोत्सव समितीतर्फे जय्यत तयारी

कोल्हापूरचा नवरात्रौत्सव व दसरा सणाची ओळख
Successful preparations by Dussehra Mahotsav Committee
कोल्हापूर : विजयादशमीच्या सीमोल्लंघन सोहळ्यासाठी दसरा चौक असा सज्ज झाला आहे. Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : धार्मिक परंपरा, ऐतिहासिक वारसा आणि सामाजिक किनार लाभलेला सण म्हणून कोल्हापूरचा नवरात्रौत्सव व दसरा सणाची ओळख आहे. गेले नऊ दिवस नवरात्रौत्सव सोहळा प्रतिवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा झाला. नवरात्रौत्सवाचा मुख्य दिवस दसरा असून शनिवारी सायंकाळी विजयादशमीच्या शमीपूजनाने याची सांगता होणार आहे. याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, दसरा सणानिमित्त करवीर निवासिनी अंबाबाई, जुना राजवाडा येथील तुळजाभवानी देवी मंदिरासह नवदुर्गा मंदिरांत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दसरा चौकात जय्यत तयारी

छत्रपतींची राजधानी असणार्‍या कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा सोहळ्याला अनेक वर्षांची प्रसिद्ध परंपरा आहे. प्रतिवर्षीप्रमाणे शनिवारी (दि. 12) सूर्यास्तावेळी म्हणजेच सायंकाळी 6 वाजून 11 मिनिटांनी शमीपूजनाचा सोहळा खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते व संभाजीराजे, मालोजीराजे, शहाजीराजे व यशराजराजे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी कोल्हापूर दसरा महोत्सव समिती, छत्रपती देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यासह महापालिका व प्रशासनाच्या विविध विभागांच्या वतीने करण्यात आली आहे.

दरम्यान, दसरा मैदानात लकडकोट उभारून त्यावर शमीपूजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मैदानाच्या पूर्वेकडे स्वराज्याचा भगवा ध्वज व जरीपटका उभारण्यात आला आहे. हुजूर स्वार्‍यांसह सरदार, जहांगीरदार, मानकरी यांसह प्रशासकीय अधिकारी, समाजाच्या विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी यांच्या बैठक व्यवस्थेसाठी मैदानाच्या पश्चिम व उत्तर बाजूस मंडप (शामियाना) उभारण्यात आला आहे. पावसामुळे दसरा मैदानावर ठिकठिकाणी चिखल झाल्याने मुरुम, वाळू, खडीचा वापर करण्यात आला आहे.

हिल रायडर्सचे नगारखान्यास तोरण

विजयादशमी - दसरा सणानिमित्त हिल रायडर्स ग्रुपतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे जुना राजवाड्याच्या नगारखाना या मुख्य प्रवेशद्वारास तांब्याच्या कलशाचे मंगल तोरण बांधण्यात येणार आहे. यंदा उपक्रमाचे 35 वे वर्ष आहे. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता हा कार्यक्रम होईल. ऐतिहासिक वास्तूंचे जतन व्हावे, आपला शौर्यशाली इतिहास आजच्या युवा पिढीला माहिती व्हावा, कोल्हापुरात येणार्‍या पर्यटकांना इतिहासाची माहिती व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन हिल रायडर्स परिवाराचे प्रमुख प्रमोद पाटील यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news