

कोल्हापूर : बाळाला जन्म देणं हा स्त्रीसाठी नवा जन्मच असतो, असं म्हटलं जातं. प्रसूती वेदना सहन करून ती आई होण्याची अनुभूती घेत असते. पण नियती जेव्हा तिला असंख्य वेदनांचे चटके देते, तेव्हा तिच्यातील मातृत्वाची ताकद नियतीवर मात करू शकते, हे दाखवून दिले आहे सीपीआरच्या प्रसूती विभागात उपचार घेतलेल्या दीपाली पाटोळे या अवघ्या 24 वर्षाच्या माऊलीने. बाळाला जन्म देण्यासाठी आतूर असतानाच मेंदूत रक्तस्राव झाल्याचे निदान झाले. अशातच दीपालीवर एका पाठोपाठ सिझेरियन प्रसूती आणि मेंदूवरील शस्त्रक्रिया करण्यात आली. नियतीच्या या दोन्ही संकटकाळात दीपालीचे मातृत्व जिंकले. अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांनंतर जेव्हा दीपालीने डोळे उघडले अन् बाळाला कुशीत घेतले तेव्हा तिच्यातील वात्सल्यालाच पाझर फुटला.
पुलाची शिरोली येथील 24 वर्षीय गर्भवती दीपाली पाटोळे हिला 13 नोव्हेंबर रोजी सीपीआर येथे गंभीर अवस्थेत मेडिसिन विभागात मध्यरात्री दाखल केले होते. यानंतर डॉ. बुद्धीराज पाटील यांनी रुग्णाची त्वरित तपासणी केली. निदान न लागल्याने रुग्णास पुढील तपासणीसाठी रेडिओलॉजी विभागात दाखल केले. येथे डॉ. स्वेनिल शहा यांनी तिची एमआरआय तपासणी केली. मेंदूत रक्तस्राव झाल्याने निदान झाले. मेंदू तज्ज्ञ डॉ. निशांत गब्बूर यांच्याकडे पुढील उपचार सुरू केले. मेंदूची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला त्यांनी दिला. पण नऊ महिने पूर्ण झालेल्या गरोदर महिलेवर ही शस्त्रक्रिया जोखमीचे होते. त्यांनी प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना देशमुख, डॉ. रणजित कदम यांच्याशी चर्चा केली. त्यांनी त्वरित सोनोग्राफी करून घेतली. यात बाळाच्या गळ्याभोवती नाळ गुंडाळल्याचे निदान झाले. त्यामुळे सिझर करण्याचा सल्ला दिला.
वैद्यकीय पथकाने दीपालीला धीर देत प्रथम तिची सिझेरियन प्रसूती केली. त्यानंतर लगेच मेंदूवरील शस्त्रक्रिया न्यूरोसर्जन डॉ. निशांत गब्बूर यांनी केली. एकाच दिवशी एका रुग्णांवर अशा प्रकारची जोखमीची शस्त्रक्रिया करण्याची सीपीआरच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असल्याचे डॉ. पाटील यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
यावेळी मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. अनिता परितेकर, डॉ. विद्या पाटील, रेडिओलॉजी विभाग प्रमुख डॉ. संजय देसाई उपस्थित होते. वैद्यकीय पथकात बालरोग विभाग प्रमुख डॉ. संगीता कुंभोजकर, भूल शास्त्र विभागाच्या डॉ. दीपलक्ष्मी, डॉ. मंगेश शिंदे यांच्यासह वैद्यकीय पथकाने विशेष परिश्रम घेतले. अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण मिरजे, डॉ. गिरीश कांबळे यांचे सहकार्य लाभले.
दीपालीचे डोळे पाणावले...
15 नोव्हेंबर 2001 रोजी दीपालीचा जन्म झाला. त्याच दिवशी तिच्या आईचे निधन झाले होते. आईविना पोरकी झालेल्या दीपालीला मायेची ऊब मिळालीच नाही. 24 वर्षांनी पुन्हा तसाच प्रसंग दीपालीच्या समोर होता. नियतीच्या अशा या फेर्याला परतवून लावून दीपालीने स्वतः बरोबर आपल्या बाळालाही नवे आयुष्य दिले. माझे बरेवाईट झाले असते तर माझ्या बाळाला माझ्यासारखे आईविना जीवन जगावे लागले असते. त्या प्रसंगाच्या आठवणीने दीपालीचे डोळे पाणावले होते.