

कोल्हापूर : भविष्यातील वाढती लोकसंख्या आणि आवश्यक गोष्टींचा विचार करा. त्यानुसार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देता येतील, या द़ृष्टीने क्रीडा संकुलाचा आराखडा राज्य शासनाला सादर करा, असे आदेश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रविवारी दिले. छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलाची त्यांनी पाहणी केली.
क्रीडा उपसंचालक माणिक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस व क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य सचिन चव्हाण यांनी संकुलातील कामांची माहिती दिली. दुसर्या टप्प्यात संकुलाच्या उर्वरित कामांचा 146 कोटींचा, सिंथेटिक ट्रॅकचा 21 कोटींचा आणि आवश्यक क्रीडा साहित्यांचा 10 कोटींच्या अशा 177 कोटींच्या आराखड्याची माहिती दिली. त्यावर या सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असाव्यात, यासाठी क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागारांची नेमणूक करून सर्वसमावेशक आराखडा तयार करा आणि तो शासनाला सादर करा, असे सांगत सध्या सुरू असलेल्या कामात कोणतीही तडजोड न करता, त्याचा उच्च दर्जा राखा. वेळेत कामे पूर्ण करा. खेळाडूंना लवकरात लवकर या सुविधांचा लाभ द्या.
आबिटकर यांनी यावेळी लॉन टेनिस संकुल, शूटिंग रेंज, जलतरण तलाव, व्यायामशाळा, अॅथलेटिक्स व खो-खो मैदानांची पाहणी केली. संकुलातील सराव व स्पर्धांची माहिती घेतली. मुले व मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, प्रेक्षक गॅलरी, चेजिंग रूम करा. पक्षी व वटवाघळांचा बंदोबस्त करा, शूटिंग रेंजमध्ये प्रसन्न वातावरणासाठी आकर्षक रंगसंगती, डिझाईनसह प्रेरणादायी खेळाडूंची छायाचित्रे, माहिती फलक लावा. संकुलातील स्पर्धा पाहण्यासाठी खुल्या करा, त्यातून नवे खेळाडू घडतील, असे सांगत नागरिकांनाही व्यायाम व फिरण्यासाठी स्वतंत्र सुविधा निर्माण करा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार अमल महाडिक यांनीही सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
चार कोटी रुपये खर्चून बांधलेल्या जलतरण तलावाचा वापर झालेला नाही. यासाठी कारणीभूत असणार्या ठेकेदारावर दोन आठवड्यांत कारवाई करा, असे आदेश आबिटकर यांनी जिल्हाधिकार्यांना दिल्या.