

अर्जुनवाडा : तुरंबे (ता. राधानगरी) येथील नम्रता मोहन कांबळे (वय 13) या शाळकरी मुलीने विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. नम्रताचा मृतदेह शुक्रवारी सकाळी गावाशेजारील विहिरीत आढळला. याबाबत तिच्या वडिलांनी राधानगरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
मोहन कांबळे यांना तीन मुली. आई-वडील मोलमजुरी करून मुलींचे पालनपोषण करत होते. बुधवारी शाळेच्या मधल्या वेळेपासून बेपत्ता असलेल्या नम्रताचा मृतदेह विहिरीत आढळल्याने ग्रामस्थांना धक्का बसला. घटनास्थळी ग्रामस्थ, नातेवाईकांनी गर्दी केली होती. तिच्या आई-वडिलांचा आक्रोश पाहून उपस्थित अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.
घटनास्थळी डीवायएसपी आप्पासो पोवार, पोलिस निरीक्षक किशोर शिंदे, उपनिरीक्षक आकाशदीप भोसले, किरण पाटील, के. एम. खामकर यांनी भेट दिली.