

बांबवडे : पिशवी पैकी व्हनांगडेवाडी तालुका शाहूवाडी येथील श्रीधर संजय व्हनांगडे (वय १४) या विधार्थ्याचा ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू झाला. बांबवडे येथून तो शिष्यवृत्ती परिक्षा देऊन घरी जात असताना ही घटना घडली. या घटनेची नोंद शाहूवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिशवी पैकी व्हनांगडेवाडी (ता. शाहुवाडी) येथील श्रीधर व्हनांगडे हा इयत्ता आठवी मध्ये बांबवडे येथील महात्मा गांधी विद्यालयात शिकत होता. आज त्याची शिष्यवृत्तीची परीक्षा बांबवडे केंद्रावर होती. पेपर संपल्यानंतर श्रीधर आपल्या मित्रासोबत व्हनांगडेवाडीकडे पायी चालत निघाला होता. दरम्यान, उदय साखर कारखान्याहून ऊस उतरून परत निघालेल्या रिकाम्या ट्रॅक्टर चालकाला पायी चालत निघालेल्या विद्यार्थ्यांनी हात करून थांबवले व त्यात बसून गेल्यानंतर खाली उतरताना ट्रॅक्टर चालकाला न सांगताच श्रीधर ट्रॅक्टर मधून उडी मारून खाली उतरला यामध्ये त्याचा तोल गेल्याने तो ट्रॉलीच्या मागील चाकाखाली सापडला. आणि यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हा सर्व प्रकार इतका अचानक झाला की काही वेळासाठी कुणालाच काही कळलेच नाही, श्रीधर यास लगेचच बांबवडे येथे उपचारासाठी दाखल केले परंतू त्याचा जागीच मृत्यू झाला होता.
श्रीधर हा एकुलता एक होता. त्याच्या पश्चात आई-वडील व एक बहीण असा परिवार आहे. मलकापुर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.या घटनेमुळे संपूर्ण पिशवी गावावर शोककळा पसरली आहे.