El Nino Impact | ‘अल निनो’चा पावसाला फटका; येणारा हिवाळाही ‘हॉट’!

El Nino Impact |
El Nino Impact | ‘अल निनो’चा पावसाला फटका; येणारा हिवाळाही ‘हॉट’!
Published on
Updated on

आशिष शिंदे

कोल्हापूर : प्रशांत महासागरात आकार घेतलेल्या शक्तिशाली अल निनोचा परिणाम यंदाच्या पावसाळ्यावर जाणवला. आता त्याचे पडसाद आगामी हिवाळ्यातही उमटण्याची भीती आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जूनपासून आतापर्यंत सरासरीच्या केवळ ५४ टक्के पाऊस झाला आहे. अल निनोमुळे आता हिवाळ्यात नेहमी राहणारा ‘ठंंडा ठंडा, कूल कूल’ फिल यंदा ‘हॉट हॉट’ राहण्याची भीती आहे. अल निनोचा प्रभाव फेब्रुवारी २०२७ पर्यंत राहण्याची शक्यता असल्याने विशेषतः उत्तर महाराष्ट्राच्या तुलनेत दक्षिण अक्षांशावर असलेल्या कोल्हापूरमध्ये हिवाळ्यात उबदारपणाचा परिणाम अधिक जाणवू शकतो, असे हवामानतज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे हिवाळ्यात तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे.

यंदा पावसाला बसलेला फटका आणि पुढे अपेक्षित उबदार हिवाळा यामुळे कोल्हापूरच्या शेतीसमोर दुहेरी आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. ऊस, गहू, हरभरा तसेच काही भाजीपाला पिकांना वाढीच्या विशिष्ट टप्प्यांवर आवश्यक थंडी मिळणे महत्त्वाचे असते. तापमान सरासरीपेक्षा जास्त राहिल्यास पिकांना मिळणारे ‘चिलिंग अवर्स’ कमी होऊ शकतात. त्यातच यंदा पावसाची तूट असल्याने जमिनीतील ओलावा आणि भूजल पातळी कमी राहिल्यास नोव्हेंबर, डिसेंबरनंतर पिकांवर पाण्याचा ताण वाढू शकतो.

सरासरीच्या निम्माच पाऊस

अल निनोच्या प्रभावामुळे अरबी समुद्राकडून येणारी मान्सूनची शाखा कमजोर झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात यंदा पावसाने मोठी तूट दिली आहे. जूनपासून जिल्ह्यात सरासरी १,६१३.८ मिलिमीटरच्या तुलनेत केवळ ८७२ मिलिमीटर पाऊस झाला असून, तब्बल ७४१.८ मिलिमीटरची तूट आहे. विशेषतः पश्चिमेकडील तालुक्यांची स्थिती चिंताजनक असून राधानगरीत ४०.६ टक्के, चंदगडमध्ये ४०.५ टक्के, आजऱ्यात ५९ टक्के आणि गगनबावड्यात ६३.७ टक्के इतकाच पाऊस झाला आहे.

अल निनोच्या वर्षांत उत्तर भारतात पश्चिमी विक्षोभांची वारंवारता वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरुवातीच्या हिवाळ्यात उत्तर भारतातील पर्वतीय भागात बर्फवृष्टी झाली आणि परिस्थिती अनुकूल राहिली, तर त्यानंतर थंड वारे दक्षिणेकडेही पोहोचू शकतात. कोल्हापुरात थंडीचे काही टप्पे जाणवण्याची शक्यता असली, तरी त्यांचा कालावधी कमी आणि सातत्य मर्यादित राहण्याची शक्यता आहे. परिणामी, सकाळ, रात्रीच्या तापमानात नेहमीची घट न दिसता दिवस अधिक उबदार राहू शकतात.

अथ्रेय शेट्टी, हवामानतज्ज्ञ, मुंबई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news