

कोल्हापूर : राज्यातील मध्यवर्तीसह जिल्हा कारागृह प्रशासनांतर्गत सुधारणा घडविण्यासाठी प्रसंगी कठोर उपाय योजना राबविणे महत्त्वाचे आहे, असे राज्यातील कारागृह व सुधारसेवा प्रशासनाचे नवे अपर पोलिस महासंचालक डॉ. सुहास वारके यांनी दैनिक ‘पुढारी’ शी बोलताना रविवारी स्पष्ट केले. कारागृहातील कैद्यांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांच्यात परिवर्तन घडविण्यासाठीही प्रयत्न करावे लागतील, असेही ते म्हणाले.
राज्यातील कारागृह व सुधार सेवा प्रशासनाच्या अपर पोलिस महासंचालकपदी सुहास वारके यांची नुकतीच पदोन्नतीवर नियुक्ती झाली आहे. वारके लवकरच कार्यभर स्वीकारणार आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून यापूर्वी जबाबदारी स्विकारलेले सुहास वारके यांच्यावर नागरी हक्क संरक्षण विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक पदाचा कार्यभार होता. तत्पूर्वी, छत्रपती संभाजीनगर येथेही वरिष्ठ पोलिस अधिकारी म्हणून ते कार्यरत होते.
वारके पुढे म्हणाले, राज्यातील कारागृह आणि सुधारसेवा प्रशासनांतर्गत अपर पोलिस महासंचालकांची जबाबदारी सांभाळणे एक आव्हानात्मक आहे; पण तितकीच कामाची संधीही आहे. आर्थर रोड, पुण्यातील येरवडा, ठाणे, तळोजा, कोल्हापूर येथील कळंबा, कोल्हापूरसह राज्यातील 9 मध्यवर्ती, जिल्हा कारागृहासह खुल्या कारागृहामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. गुन्हेगारी टोळ्यांची दहशत व त्यांच्या गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी प्रसंगी कठोर पावलेही उचलावी लागणार आहेत.
राज्यातील बहुतांश म्हणजे 52 पेक्षा अधिक वेगवेगळ्या वर्गवारीतील कारागृहामध्ये न्यायालयीन बंदी आणि दोषसिद्ध झालेल्या कैद्यांची संख्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. विशेषत: 18 ते 25 वयोगटातील बंदींची संख्या सर्वाधिक आहे. या तरुण कैद्यांच्या परिवर्तनाचे मोठे आव्हान आहे. गुन्हेगारीतून मुक्त हाऊन भविष्यात चांगले जीवन जगण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या द़ृष्टीने प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शिबिर, मार्गदर्शन कार्यशाळाही आयोजित करण्यासाठी प्राधान्य राहील, असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापुरातील कळंबा कारागृहात अलीकडच्या काळात काही गैरप्रकार घडले. भक्कम सुरक्षा असलेल्या सेंटरजेलमध्ये अशा घटना अपेक्षित नाहीत. कोल्हापूर दौर्यात कळंबा आणि बिंदू चौक येथील जेलची पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बिंदू चौक स्थलांतराच्या प्रस्तावाची माहिती घेऊन बोलू; मात्र कारागृहात चुकीच्या गोष्टी घडणार नाहीत याची प्रशासन दक्षता घेईल, असेही त्यांनी सांगितले.
ऑर्थर रोड, पुणे येथील येरवडा, तळोजा, कोल्हापूर येथील कळंबा कारागृह ही महाराष्ट्रातील प्रमुख सेंटर कारागृहे आहेत. तेथील सुरक्षा व्यवस्थेला प्राधान्य द्यावे लागेल. कारागृहातील रिक्त पदांसह मनुष्यबळ वाढविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करावे लागतील, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा व खुल्या कारागृहातील कैद्यांना 24 तास आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पावले टाकण्यात येतील.