

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेत झालेल्या ड्रेनेज कामाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या द्विसदस्यीस समितीने चौकशीअंती घोटाळा झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. तथापि हा प्राथमिक अहवाल आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. प्रशासन स्तरावर कडक कारवाई तर होईलच; पण आता फौजदारीही करण्यात येईल. सध्या दिलेल्या फिर्यादीमध्ये कनिष्ट अभियंता प्रज्ञा गायकवाड यांच्यासोबतच आणखी एका वरिष्ठ अधिकार्याच्या नावाचाही समावेश करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर महापालिकेत ड्रेनेज लाईनचे काम न करताच 85 लाख रुपयांचे बिल उचलल्याचा आरोप माजी नगरसेवक व शिवसेना जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांनी केला होता. या प्रकरणातील ठेकेदार श्रीप्रसाद वराळे याने हे बिल मिळविण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांपासून ते पवडी विभागातील क्लार्कपर्यंत कोणाला किती पैसे दिले याची यादी जाहीर केली आहे. या प्रकरणात महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी तिघांना तत्काळ निलंबित केले; तर अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर व शहर अभियंता रमेश मस्कर यांना चौकशी करण्याचा आदेश दिला होता. ही चौकशी पूर्ण करून गुरुवारी रात्री हा अहवाल प्रशासक मंजुलक्ष्मी यांना सादर करण्यात आला. या अहवालासंदर्भात मंजुलक्ष्मी यांना विचारले असता अहवालात सकृदर्शनी हा घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणाची आणखी सखोल चौकशी केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
महापालिकेत झालेल्या ड्रेनेज घोटाळ्यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने बिल मंजूर करण्यात आले. यासाठी ज्या ज्या अधिकार्यांनी ‘डिजिटल की’ वापरल्या आहेत, त्याचाही एक स्वतंत्र अहवाल तयार केला जाणार आहे. महापालिकेचे सिस्टीम मॅनेजर यशपाल रजपूत यांना यासंदर्भातील अहवाल तयार करायला सांगीतले आहे, अशी माहितीही महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
या प्रकरणात आमचा संबंधच नाहीि, आमच्या खोट्या सह्या कुणीतरी केल्याचे स्पष्टीकरण संबंधित अधिकार्यांनी दिले आहे. या सह्यांची शहानिशा करण्यासाठी आपण तपास अधिकार्यांशी चर्चा केली आहे. फॉरेन्सिक लॅबद्वारे आता या सह्यांची शहानिशा केल्यानंतर सत्य बाहेर येईल, असे प्रशासक मंजुलक्ष्मी म्हणाल्या.
ठेकेदार श्रीप्रसाद वराळे याने आमच्या खोट्या सह्या करून बिल उचलल्याचा दावा काही अधिकार्यांनी महापालिका प्रशासकांना दिलेल्या खुलाशामध्ये केला आहे. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, ज्यांनी या आपल्या सह्याच नाहीत असा दावा केला आहे, त्यांनी या प्रकरणात पोलिसांत फिर्याद द्यावी. पोलिस त्याची चौकशी करतील. आमच्या स्तरावरही आम्ही चौकशी सुरू केली आहे.
कसबा बावडा ड्रेनेज लाईन घोटाळाप्रकरणी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी शुक्रवारी रात्री पवडी विभागातील पहारेकरी कुणाल रमेश पोवार याला निलंबित केले. याप्रकरणी यापूर्वी कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड, पवडी अकौंटंट तथा सहा. अधीक्षक बळवंत सूर्यवंशी, वरिष्ठ लिपिक जयश्री हंकारे यांना यापूर्वीच निलंबित केले आहे. निलंबनाची कारवाई केलेले अधिकारी, कर्मचारी यांची संख्या चार झाली आहे.कसबा बावडा येथील ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण होण्याअगोदरच ठेकेदार श्रीप्रसाद वराळे याला बिल आदा केल्याप्रकरणी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी या प्रकरणामध्ये दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाईचा सपाटा लावला आहे. कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड यांनी त्यांची एमबी चोरीस गेल्याचे सांगितले होते. त्यामुळे एमबी चोरीस जाण्यास पवडी विभागातील पहारेकरी कुणाल पोवार याला दोषी धरत के. मंजुलक्ष्मी यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.