

कोल्हापूर : मुरगूड (ता. कागल, जि. कोल्हापूर) जवळील सोनगे येथे शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपर फोडण्याचा प्रकार उघडकीस आला. याची राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने तत्काळ गंभीर दखल घेतली आहे. ‘टीईटी’ पेपर फोडणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूड जवळील सोनगे येथे रविवारी पहाटे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि मुरगूड पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत ‘टीईटी’चा पेपर फोडणारी टोळी जेरबंद केली. याप्रकरणात सातारासह कोल्हापूर जिल्ह्यांतील राधानगरी, कागल येथील पाच शिक्षक सहभागी आहेत. उर्वरित टोळीतील साथीदारांसह 18 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून कोणकोणत्या परीक्षांचे पेपर फोडले आहेत, याचा तपास पोलिस करीत आहेत.
‘टीईटी’ पेपर फोडण्याच्या प्रकरणाची माहिती मिळाली आहे. त्यानुसार शिक्षण विभागाला तत्काळ सर्व माहिती घेण्याचे आदेश दिले आहेत. काही दिवसांपूर्वी प्राथमिक शिक्षकांनाही ‘टीईटी’ परीक्षा देणे सर्वोच्च न्यायालयाने बंधनकारक केले आहे. त्यामुळे काही शिक्षक यात सहभागी झाल्याची माहिती समजते. सध्या या प्रकरणाची पोलिस चौकशी करीत आहेत. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित पाच शिक्षकांसह 18 जणांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील शिक्षणमंत्री भुसे यांनी दिला आहे.