

कोल्हापूर : राज्यात ‘स्टेनो’ पदाची (लघुलेखक संवर्ग) भरती होणार आहे. राज्य शासनाने ५ मे २०२५ रोजी राज्यातील सर्व स्टेनोची पदे मृत संवर्ग म्हणून घोषित केली होती. या निर्णयाला एक वेळेची विशेष बाब म्हणून एक वर्ष मुदतवाढ दिली आहे. यामुळे या पदासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, ही पदे कायमस्वरूपी ठेवा, या मागणीवर विद्यार्थी ठाम आहेत.
राज्य शासनाने ५ मे २०२५ रोजी लघुलेखक हा ‘मृत संवर्ग’ घोषित केला होता. यामुळे सर्व शासकीय विभागातील ही पदेच रद्द झाली. यामुळे या पदांसाठी तयारी करणारे विद्यार्थी संतापले होते. कायमस्वरूपी ही पदेच रद्द केल्याने याच पदासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांचा सरकारी नोकरीचा मार्गच बंद झाला. ही पदे पूर्ववत करावीत, त्यानुसार दरवर्षी रिक्त होणाऱ्या या पदांची भरती प्रक्रिया पूर्ववत सुरू व्हावी याकरिता विद्यार्थ्यांनी आंदोलनही केले. सध्या सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थी आंदोलनात ही मागणीही केली जात आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आणि विद्यार्थी संघटनांच्या मागण्यांची दखल घेत राज्य शासनाने या निर्णयाला एक वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.
वर्षानंतर पुन्हा स्टेनो ‘मृत संवर्ग’
स्टेनो पदासाठी लागू केलेला शासन निर्णय झाल्यापासून (९ सप्टेंबर) पुढील एक वर्षापर्यंत ही मुदतवाढ मर्यादित राहील. यानंततर लघुलेखक संवर्ग पूर्ववत ‘मृत संवर्ग’ म्हणून घोषित राहणार आहे.