कोल्हापूर : वृत्तपत्र विक्रेते व एजंटांसाठी राज्य सरकारने घोषणा केलेल्या स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची 26 जानेवारीपर्यंत कार्यवाही करा; अन्यथा राज्यव्यापी लढा उभा करू, असा निर्धार महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता व एजंटस् संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र पदाधिकार्यांच्या बैठकीत सोमवारी (दि. 18) करण्यात आला. जिल्हानिहाय आंदोलनाची तीव्रता वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी, आमदार, खासदारांना निवेदन देण्यासह पालकमंत्र्यांच्या घरांवर कुटुंबीयांसह मोर्चा काढण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. बैठकीला कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर येथील संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता व एजंटस् संघटनेचे अध्यक्ष शिवगोंडा खोत (इचलकरंजी) होते. कावळा नाका येथील काँग्रेस कमिटीच्या सभागृहात ही बैठक झाली. संघटनेचे राज्याध्यक्ष खोत म्हणाले की, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची तीव्रता वाढविली पाहिजे. यासाठी सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांची एकजूट असणे महत्त्वाचे आहे. संघटित लढा दिला तरच सरकारकडून आपल्या प्रश्नांची सोडवणूक होईल.
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना विभागीय उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे म्हणाले, संघर्ष केल्याशिवाय काहीच पदरात पडत नाही. त्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ कार्यान्वित करण्यासाठी लढा उभा करावा लागेल. याची मशाल पश्चिम महाराष्ट्रात पेटवावी लागले. एक वर्ष झाले तरी कल्याणकारी मंडळाबाबत ठोस काही झालेले नाही. अन्य अनेक कल्याणकारी मंडळे झाली; मग आमच्यावरच अन्याय का? अनेक वृत्तत्रप विक्रेत्यांची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यांना कल्याणकारी मंडळाचा फायदा होणार आहे. त्यामुळे शासनाने त्वरित ते कार्यान्वित करावे, असे सांगितले. विकास सूर्यवंशी म्हणाले, कल्याणकारी मंडळाचा पाठपुरावा करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. आपल्यातील मतभेद बाजूला ठेवून संघर्षाची तयारी ठेवूया. वृत्तपत्रांचा आपण घरचा घटक आहोत. त्यामुळे वृत्तपत्रांचे संपादक, मालक यांना सोबत घेऊन हा लढा यशस्वी करूया, असे सांगितले. कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंटस् असोसिएशन अध्यक्ष किरण व्हनगुत्ते म्हणाले, पाठपुरावा केल्यास आपल्याला न्याय मिळेल. वृत्तपत्रांतील कर्मचार्यांनादेखील या महामंडळाचा फायदा होणार असल्याचे सांगितले. यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांनी सूचना मांडल्या.
शिवलिंग मेढगाव (सोलापूर), सचिन चोपडे (सांगली), राजेंद्र माळी, राजेंद्र पोवार (सातारा), परशुराम सावंत, शिवानंद रावळ, सौरभ लाड, सतीश दिवटे, अण्णा गुंडे, सुरेश बह्मपुरे, अंकुश परब, धनंजय शिराळकर, सुरेंद्र चौगुले, समीर कवंकर, सागर रुईकर, धनंजय राजहंस, रमेश जाधव, सुरेश चौगुले, सचिन दामाडे, महेश घोडके, विनोद पाटील, अरुण पाटील, इंद्रजित पोवार, मारुती नवलाई, दीपक वाघमारे, श्रीकांत दुधाळ, सागर घोरपडे, सतीश दिवटे, धनंजय सावंत, सुनील पाटील, सुरेश कापसे, सुकुमार पाटील, सागर घोरपडे, प्रशांत जगताप, शिवाजी जाधव, पोपट मंडले, नानासो बोंगाणे, संदीप माळी, धनंजय सूर्यवंशी, राजेंद्र माळी, श्रीपाद पाटील, नंदकुमार बोबाडे, विनायक तोंबोळकर, अण्णासो पाटील, शिवाजी माळी, शामराव पाटोळे, गणेश पवार, भास्कर मोडे, विकास क्षीरसागर, संदीप गिरीगोसावी, सदाशिव साळोखे, नागेश गायकवाड, उत्तम चौगुले, सुनील पवार, विशाल रासनकर, सचिन माळी, पोपट घोरपडे, नारायण माळी, एन. टी. कोष्टी, संजय परीट, दादासो मुजावर, राजकुमार कोळी, महारुद्र कुंभार, सुरेश खोत, नामदेव लुगडे, आनंद गुरव, बाबासाहेब पाटील, रत्नाकर शिंदे, शिवाजी मगदूम, सुकुमार बुगटे यांच्यासह वृत्तपत्र विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ कार्यान्वित करा
* राज्यातील सर्व वृत्तपत्रमालकांनी कल्याणकारी मंडळासाठी मुख्यमंत्री, कामगारमंत्री यांना पत्र द्यावे
* जिल्हाधिकारी यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन द्यावे
* आमदार, खासदार, मंत्री यांना निवेदन द्यावे