

कोल्हापूर : अलमट्टी धरणाच्या उंची वाढीबाबत केंद्र शासनाने चार राज्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्य शासन उंची वाढीच्या विरोधात ठाम भूमिका मांडणार असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले. जागतिक बँकेच्या मदतीने राबविण्यात येणार्या पूर नियंत्रणांच्या प्रकल्पासाठी नागरिक, संस्थांच्याही सूचना घेतल्या जातील, याकरिता पुढील आठवड्यात बैठक घेऊ, असेही त्यांनी सांगितले.
आबिटकर म्हणाले, अलमट्टी धरणामुळे जिल्ह्यात महापुरासारखी परिस्थिती निर्माण होते. यामुळे या धरणाच्या उंची वाढीला राज्य शासनाने यापूर्वीच आक्षेप घेतला आहे. या विरोधातील जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही शासनाची भूमिका कायम असल्याचे सांगितले आहे. 18 जून रोजी नवी दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे कर्नाटकसह महाराष्ट्र, तेलगंणा आणि आंध— प्रदेश या राज्यांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत राज्य शासन अलमट्टी धरणाच्या उंची विरोधात ठाम भूमिका मांडेल, असेही त्यांनी सांगितले.
शक्तिपीठ महामार्गासाठी सर्वेक्षण सुरू झाले आहे. सर्वेक्षण करणार्या अधिकार्यांना शेतकर्यांनी पिटाळून लावले, याबाबत विचारता आबिटकर म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाला शेतकर्यांचा विरोध आहे, त्याचबरोबर राज्य शासनाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्पही आहे, असे सांगत, शेतकर्यांची भूमिका पुन्हा राज्य शासनाला सांगू, असेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम पाहून अनेकजण शिवसेनेत येत आहेत. चंद्रहार पाटील यांचे स्वागत आहे. कोल्हापूर शहरातही माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यांचाही लवकरच पक्ष प्रवेश होईल. जे जे येतील त्यांना सोबत घेऊन काम केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.