कोल्हापूर : कर्मचार्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री यांच्याशीच चर्चा करू, अन्यथा तोपर्यंत संप सुरूच ठेवू, अशी भूमिका राज्य सरकारी कर्मचार्यांनी बुधवारी स्पष्ट केली. जुनी पेन्शन योजना लागू करण्यास अडथळा असलेली ‘पीएफआरडीए’ची योजना रद्दचा प्रस्ताव प्रथम केंद्राला पाठवा, त्यानंतरच चर्चा करू, असे समन्वय समितीचे निमंत्रक अनिल लवेकर यांनी बुधवारी सांगितले.
संपाच्या दुसर्या दिवशी महावीर उद्यानात कर्मचार्यांनी निदर्शने केली, घोषणाबाजी केली. यावेळी लवेकर म्हणाले, संपकर्यांच्या मागण्यांबाबत राज्य शासनाच्या अप्पर मुख्य सचिवांनी बैठकीला मंगळवारी बोलावले होते. मात्र, संप कर्मचार्यांचा सुरू असताना त्यांच्याबरोबर राजपत्रित अधिकारी महासंघालाही बोलवले. वास्तविक संप ज्यांचा, त्या कर्मचारी, शिक्षकांच्या प्रतिनिधींनाच बोलवणे अपेक्षित होते. यामुळे अशा बैठकीला कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले नाहीत.
संपकरी कर्मचारी, शिक्षकांच्या मागण्यांबाबत अप्पर मुख्य सचिव ठोस निर्णय घेणार आहेत का? त्यांना तसे अधिकार आहेत का? असे सवाल करत याबाबत मुख्यमंत्र्यांनीच चर्चा करावी, अन्यथा चर्चा करणार्या अधिकार्यांना लेखी स्वरूपात सर्वाधिकार द्यावेत, तरच अधिकार्यांशी चर्चा होईल. मात्र, या सर्व चर्चा करण्यापूर्वी राज्य शासनाने ‘पीएफआरडीए’ योजना रद्द करण्याचा प्रस्ताव केंद्राला पाठवावा तरच चर्चा पुढे जाईल, असेही लवेकर यांनी सांगितले. यावेळी घोरपडे, शासकीय मुद्रणालयाचे संजय पाटील, महसूलचे विनायक लुगडे, उच्च शिक्षण विभागाचे डॉ. प्रवीण कोडोलीकर, वस्तू व सेवा कर विभागाचे तुषार पाटील, सेवा निवृत्त चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे रामचंद्र रेवडे, नर्सिंग फेडरेशनच्या हशमत हावेरी, संजीवनी दळवी, जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष वसंत डावरे, संजय क्षीरसागर, रमेश भोसले, नारायण पाटील, नंदकुमार इंगवले, राजदीप घोडके आदींची भाषणे झाली.
संपाला शिवसेना उबाठा गटाचे उपनेते संजय पवार, सेवानिवृत्त एसटी कर्मचारी संघटनेचे रवी जाधव, शेकापचे प्राचार्य टी. एस. पाटील, खासगी माध्यमिक शिक्षक संघटनेचे राजेश वरक, माकपचे विवेकानंद गोडसे, बहुजन परिवर्तन पार्टीचे बाजीराव नाईक, भाकपचे जिल्हा सचिव कॉ. रघुनाथ कांबळे यांनी पाठिंबा दिला.
रुग्णसेवेवर आजही परिणाम
शासकीय रुग्णालयातही दुसर्या दिवशीही संपाचा फटका जाणवला. अनेक विभागांत कंत्राटी कर्मचार्यांवरच भिस्त होती. नियमित कर्मचारी नसल्याने आजही शस्त्रक्रियांवर परिणाम झाला. अनेक पूर्वनियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. संपामुळे रुग्णसेवेवर आजही परिणाम झाल्याचेच चित्र होते.