Gokul Election : सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशाचा अवमान झाल्‍यास जबाबदारी तुमची

सहकार निवडणूक प्राधिकरणने विभागीय उपनिबंधक यांना सुनावले
Gokul Election |
Gokul Election |
Published on
Updated on

कोल्‍हापूर : गोकुळ निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी तत्‍काळ प्रसिद्ध करा. निवडणुकीबाबत सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या आदेशाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घ्‍या. प्रक्रियेस विलंब होऊन न्‍यायालयाच्‍या आदेशाचा अवमान झाल्‍यास त्‍याची सर्वस्‍वी जबाबदारी तुमची राहील, असे राज्‍य सहकार निवडणूक प्राधिकरणचे सचिव अशोक गाडे यांनी विभागीय उपनिबंधक तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी देविदास मिसाळ यांना पत्राद्वारे गुरुवारी सुनावले. तसेच यादी प्रसिद्ध करण्‍यास विलंब का झाला, याबाबत खुलासा करण्‍याचे आदेशही गाडे यांनी दिले आहेत.

गोकुळच्या प्रारूप मतदार यादीसाठी दूध संस्थांकडून प्रतिनिधींचे ठराव मागविण्याची मुदत २ जून ते ४ जुलै २०२६ अशी निश्चित केली होती. मुदतीत संबंधित संस्‍थांकडून ठरावही दाखल झाले आहेत. मात्र, इतका कालावधी उलटूनही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध न झाल्याची गंभीर दखल प्राधिकरणाने घेतली आहे. प्राधिकरणाने या विलंबामागील कारणांचा सविस्तर खुलासा तत्काळ सादर करण्याचे निर्देश दिले असून, न्यायालयाच्या आदेशांचा अवमान होणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगितले आहे.

तसेच मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या कोल्‍हापूर सर्किट बेंचने सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार गोकुळची निवडणूक ९० दिवसांत घ्‍यायची आहे. याबाबत राज्‍य सहकारी निवडणूक प्राधिकरणने कोणतीही कार्यवाही न केल्‍यास कायद्यानुसार पुढील कारवाईसाठी पात्र ठरणार असल्‍याचे आदेशात म्‍हटले आहे. त्‍यामुळे प्राधिकरणचे वकील यांच्‍याशी संपर्क करून ठराव प्रक्रिया आणि मतदार यादी संदर्भात आजअखेर केलेल्‍या कार्यवाहीचा तपशील उच्‍च न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणून देण्‍याबाबत कार्यवाही करावी, अशीही सूचना प्राधिकरणचे सचिव गाडे यांनी विभागीय उपनिबंधक मिसाळ यांना दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news