CM Devendra Fadnavis | कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गासाठी भूसंपादन सुरू करा

बंदरे विभागाच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांचे आर्थिक तरतुदीचे आदेश; मार्गाला अखेर चालना
CM Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavis | कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गासाठी भूसंपादन सुरू कराPudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर/नागपूर : अनेक वर्षांपासूनचे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणवासीयांचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गासाठी भूसंपादन सुरू करा, असे आदेश गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. केंद्र आणि राज्य सरकारच्या सहभागातून होणार्‍या या मार्गासाठी राज्य सरकारच्या हिश्श्याची तरतूद करा, असेही आदेश त्यांनी दिले. या निर्णयामुळे पावणेदहा वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या या मार्गाला अखेर चालना मिळाली आहे.

विधानभवनातील मंत्री परिषदेच्या सभागृहात बंदरे विकास विभागाची आढावा बैठक झाली, या बैठकीत देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात उभारावे, असेही आदेश त्यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्याला लाभलेला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा, निर्माणाधीन वाढवण बंदर, यामुळे सागरी क्षेत्रात अपार संधी आहेत. या सर्वांचा विचार करता, 2026 मध्ये देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात उभारावे, हे शिपयार्ड करण्यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करावा. यासाठी जागेची निश्चिती करा.

कोकणातील जयगड, आंग्रे, रेडी व विजयदुर्ग या बंदरांचा विकास करण्यासाठी वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे मार्गाची गरज आहे, असे सांगत फडणवीस म्हणाले, हा रेल्वे मार्ग केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्यातून उभारला जाणार आहे. याकरिता या मार्गासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाची तरतूदही करा, असेही आदेश त्यांनी दिले. बैठकीस मत्स्य व बंदरे विकासमंत्री नितेश राणे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, परिवहन व बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. आदींसह अधिकारी उपस्थित होते.

कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडावे ही गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होती. दि. 25 फेब—ुवारी 2016 रोजी रेल्वे अर्थसंकल्पात तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या मार्गाला मंजुरी देत निधीचीही तरतूद केली. केंद्र आणि राज्य शासनाच्या हिस्सेदारीतून हा प्रकल्प उभारला जाईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले होते. यानंतर या मार्गाचे सर्वेक्षण, डीपीआर, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आदी विविध प्रक्रिया झाल्या. मात्र, याकरिता तब्बल पावणेदहा वर्षांचा कालावधी गेला. अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भूसंपादन करण्याचे आणि राज्य शासनाच्या हिश्श्याच्या निधीची तरतूद करण्याचे आदेश दिल्याने या मार्गाच्या प्रत्यक्ष उभारणीच्या कामाला लवकरच सुरुवात होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, या निर्णयाची माहिती मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. हा निर्णय केवळ कोकणासाठी नव्हे, तर महाराष्ट्रासाठी गेमचेंजर ठरणार आहे. या रेल्वे मार्गामुळे विकासाची असंख्य दालने उघडणार आहेत. प्रामुख्याने कृषी आणि मत्स्य उत्पादनांच्या वाहतुकीला चालना मिळेल. पर्यटनात वाढ, पूर आणि भूस्खलनाच्या काळात दळणवळणाची पर्यायी सुविधा म्हणून हा मार्ग उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. जाधव यांचा पाठपुरावा

कोल्हापूर-वैभववाडी या रेल्वे मार्गासाठी दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी दीर्घकाळ पाठपुरावा केला. चार दशकांची पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणवासीयांची ही जिव्हाळ्याची मागणी तडीस नेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. दै. ‘पुढारी’चा 3 जानेवारी 2015 रोजी कोल्हापुरात अमृतमहोत्सवी सोहळा झाला होता. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी कोल्हापूर-वैभववाडी या रेल्वे मार्गाला मंजुरी देण्याची मागणी केली होती. त्याचवेळी प्रभू यांनी या मार्गाला मंजुरी देणार असल्याची घोषणा करत, 25 फेब्रुवारी 2016 रोजी 3,244 कोटी रुपयांच्या मार्गाला मंजुरी दिली. त्यापैकी केंद्र शासनाच्या 1,375 कोटी रुपयांच्या निधीची तरतूदही केली होती. यानंतरही डॉ. जाधव यांनी सातत्याने या मार्गाबाबत पाठपुरावा केला.

27 बोगदे, 55 उड्डाणपूल

या मार्गावर 28 कि.मी. लांबीचे एकूण 27 बोगदे असतील. यासह रस्त्यावरील 55 उड्डाणपूल आहेत. निसर्गाच्या कुशीतून जाणारा हा मार्ग आहे. सर्वात मोठा बोगदा 3.96 कि.मी. लांबीचा आहे. 2 कि.मी.पेक्षा जादा लांबीचे 3, तर त्यापेक्षा कमी लांबीचे 24 बोगदे असतील. या मार्गावर रस्त्यावरील 55 उड्डाणपूल, रस्त्याखालील 68 पूल असतील. यासह छोटे पूल 74, तर मोठे पूल 55 असतील. या मार्गावर एकूण 10 स्थानकेही प्रस्तावित केली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news