

कोल्हापूर : कोल्हापूर-बंगळूर व कोल्हापूर-हैदराबाद या मार्गावर आता ‘स्टार एअर’कडूनही विमानसेवा सुरू केली जाणार आहे. दि. 15 मेपासून या मार्गावर ही सेवा सुरू होईल, यामुळे या दोन्ही शहरांसाठी कोल्हापूर विमानतळावरून आता दोन कंपन्यांच्या सेवा सुरू राहतील, असे खा. धनंजय महाडिक यांनी सांगितले.
सध्या या मार्गावर दररोज एका कंपनीची सेवा सुरू आहे. त्यात आता स्टार एअरच्या सेवेची भर पडणार आहे. कोल्हापूर-हैदराबाद आठवड्यातून दर मंगळवारी आणि बुधवारी, तर कोल्हापूर-बंगळूर-कोल्हापूर या मार्गावर दर मंगळवार, बुधवारी आणि रविवारी ही सेवा सुरू राहणार आहे. यामुळे दर मंगळवार आणि बुधवारी कोल्हापूर-बंगळूर-कोल्हापूर मार्गावर दोन सेवा, तर उर्वरित दिवशी या मार्गावर एक फ्लाईट असेल. आपल्या पाठपुराव्यामुळे ही सेवा सुरू केली असून, यामध्ये वाढ करणार असल्याचे खा. महाडिक यांनी सांगितले.