

नानीबाई चिखली : सुरक्षित वातावरणात परीक्षा घेण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनने केंद्रीय स्तरावर घेण्यात येणार्या विविध परीक्षेबाबतची नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये 23 मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने पेपर संपण्यापूर्वी उमेदवाराला आता बाहेर येता येणार नाही. जर तो बाहेर आला तर मात्र एक ते सात वर्षांपर्यंत संबंधित उमेदवाराला कुठल्याही परीक्षेला बसता येणार नाही.
स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये गट ब आणि क, स्टेनोग्राफर पदांसाठीसह सरकारी कार्यालयांमधील लिपिक पदाच्या जागा भरण्यात येतात. गेल्या काही वर्षांत नोकरीसाठी होणार्या भरती परीक्षांमध्ये गैरप्रकार होत असल्याचे आढळून आले आहे. तसेच बोगस उमेदवारांचे प्रकारदेखील समोर आले आहेत. आता वगळण्यात आलेल्या उमेदवारांना आयोगाच्या कोणत्याही परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही.
स्टाफ सिलेक्शन कमिशनने कॅलेंडर जाहीर करण्यापूर्वी उमेदवारांना आधीच सतर्क केले आहे. उमेदवार चौकशीवेळी दोषी आढळला तर त्याला एका वर्षासाठी परीक्षेला बसण्यास बंदी घातली जाईल. तसेच व्हिडीओ, ऑडिओ, ब्ल्यूटूथसह अन्य डिव्हाईसचा वापर करताना उमेदवार आढळून आले तर त्याच्यावर तीन वर्षांसाठी कारवाई होऊ शकते. गैरवर्तन करणार्या उमेदवारांना परीक्षा अधिकारी लेखी स्वरूपात कळवतील. यानंतर प्रादेशिक कार्यालय संचालक दोन ते तीन तज्ज्ञांची टीम तयार करतील आणि तक्रारीची चौकशी करतील. तक्रार बरोबर असल्याचे आढळल्यास पुढील कारवाई केली जाईल.
या सर्व प्रकारात उमेदवारांना त्यांची बाजू मांडण्याची संधीदेखील दिली जाणार आहे. ज्या उमेदवाराला आधीच निलंबित करण्यात आले आहे, त्याला लेखन सहायक म्हणून मानले जाईल.