

यड्राव : एसटी चालकास मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या शहापूर पोलिस ठाण्याचा हवालदार असिफ महंमद कलायगार याला शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले. याबाबतचा आदेश अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी दिला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी दिली.
मारहाण प्रकरण मिटवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र कोणासही दाद न देता अधिकार्यांनी गुन्हा दाखल करून अटक करीत निलंबनाची कारवाई केल्यामुळे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
असिफ हा पत्नी हाफिबा यांच्यासोबत चारचाकीतून बोरपाडळे मार्गावरून येत होता. एसटीला बराच वेळ वाट दिली नसल्याच्या कारणावरून चालकाने विचारल्यावर असिफने शिवीगाळ करून चालकाच्या कानशिलात लगावली व गळपट्टी धरून मारहाण केली होती. तसेच मी पोलिस आहे, तुला विनयभंगाच्या केसमध्ये अडकवीन, माझी वरपर्यंत ओळख आहे, माझे कोणीही वाकडे करू शकत नाही, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. पत्नी हाफिबा यांनीही शिवीगाळ करून हातात चप्पल घेऊन मारहाण करून धमकी दिली होती. याबाबतचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला होता. एसटी कर्मचारी संघटनेने गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रह धरल्याने असिफ व त्याची पत्नी हाफिबा (रा. इचलकरंजी) यांच्याविरुद्ध कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन अटक केली होती. असिफच्या अशोभनीय गैरवर्तणुकीमुळे पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे. या कारणास्तव अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी असिफ यास शासकीय सेवेतून निलंबित करीत असल्याचे आदेश दिले. निलंबन काळात त्याने पोलिस मुख्यालयाला दररोज हजेरी देणे बंधनकारक आहे.