

नागाव : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील मदरसाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या एका वाहनचालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे रस्त्याकडेला असलेल्या पिलरमध्ये ही दुचाकी अडकली. या दुचाकीचा चालक उडून जोरात आपटला. सुदैवाने त्याने हेल्मेट घातले असल्यामुळे प्राण वाचला. ही घटना मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास घडली. गडहिंग्लज तालुक्यातील निलजी येथील संतोष हिरगोंडा पाटील (वय 35) असे तरुणाचे नाव आहे.
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर याच वळणावर पंधरा दिवसांतील हा दुसरा अपघात आहे. कोल्हापूर येथील एक वृद्ध आपल्या गाडीने नागाव फाटा येथील आपल्या दुकानाकडे येत असताना दिशादर्शक फलक नसल्याने कार वळणावर असलेल्या पिलरला जोराची धडकली होती. एअर बॅग उघडल्याने त्यांचे प्राण वाचले होते. सध्या महामार्गाचे काम संथगतीने सुरू असल्याने, तर अनेक ठिकाणी रस्ता पर्यायी मार्गाने वळवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी दिशा दर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या परिसरातील अपघाताच्या घटना वाढत आहेत.