

कोल्हापूर : अनंत चतुदर्शीला कोल्हापुरात विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होते. गर्दीत चेंगराचेंगरी होऊ नये, यासाठी महाद्वार रोड व परिसरात सहा ठिकाणी बाहेर जाण्यासाठी मार्ग तयार केले जाणार आहेत. एकूण मिरवणूक मार्गावर मिरजकर तिकटी ते गंगावेस या मार्गावर सहा ठिकाणी पोलिसांचे टॉवर वॉच असतील. तसेच नियमानुसार रात्री बारानंतर साऊंड सिस्टीम बंद ठेवली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर उपस्थित होते.
मुख्यत: मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेस या मार्गावर मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होते. त्यामुळे या रस्त्यावर स्वागत कमानी उभारणार्यांनी एकाच बाजूला आणि एकाच साईजमध्ये घालाव्यात. त्यामुळे एक बाजूचा रस्ता पूर्ण रिकामा राहील. पापाची तिकटी ते माळकर तिकटी या मार्गावर फेरीवाल्यांना थांबू दिले जाणार नाही. तसेच महाद्वार रोडवरील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठीही उपाययोजना केल्या जाणार असल्याचेही पोलिस अधीक्षक पंडित यांनी सांगितले.
दरम्यान, पोलीस अधीक्षक पंडित यांनी मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेस, रंकाळा तलाव येथील इराणी खण या गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी केली. यावेळी पोलिस उपअधीक्षक अजित टिके, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
१. गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेदिवशी ध्वनी प्रदूषणासंदर्भात 170 मंडळांचे रीडिंग घेतले आहे. क्षमतेपेक्षा जास्त डेसिबल आवाज असलेल्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. हीच कारवाई विसर्जन मिरवणुकीतही केली जाईल. रात्री बाराला साऊंड सिस्टीम बंद केली जाईल.
२. ज्या मंडळांना दुसर्या दिवशी सकाळपर्यंत थांबायचे आहे, त्यांनी रस्त्याकडेला थांबावे. ज्या मंडळांना पुढे जायचे आहे, त्या मंडळांना पुढे सोडावे. तसेच नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरतील असे लेसर किंवा इतर उपकरणे वापरू नयेत, असे आवाहनही पोलिस अधीक्षक पंडित यांनी केले.