कोल्हापूर ः महासैनिक दरबार मैदानाच्या भव्य स्टेजवर संगीतातील जादूगार महाराष्ट्राचे लाडके संगीतकार अजय-अतुल यांनी पहिला सूर छेडला आणि क्षणात संपूर्ण वातावरण बदलून गेले. ‘अंबाबाई गोंधळाला ये...’ अशी साद घालत त्यांनी थेट कोल्हापूरकरांच्या हृदयाला हात घातला. हजारोंच्या जनसागरातून उठणार्या उत्साहाच्या लाटांनी संपूर्ण मैदान भारून गेले.
प्रकाशझोतात न्हालेले कलाकार, रोमरोमात चैतन्य भरणारे संगीत यामुळे रसिकांनी भारावलेले क्षण अनुभवले. रात्र वाढेल तशी रसिकांचा उत्साह वाढत होता. प्रत्येक गाण्याला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळत होती. ‘झिंग झिंग झिंगाट...’ गाण्याने कार्यक्रमाचे टोक गाठले अन् संपूर्ण मैदान थिरकू लागले. या गाण्यावर प्रेक्षकांनी संपूर्ण मैदान डोक्यावर घेतले. निमित्त होते दुर्गा माँ एंटरटेन्मेंट आयोजित अजय-अतुल शोचे. पीएनजी ज्वेलर्स या शोचे मुख्य प्रायोजक, तर चितळे एक्स्प्रेस सहप्रायोजक होते. दैनिक ‘पुढारी’ माध्यम प्रायोजक, टोमॅटो एफएम रेडिओ पार्टनर, तर ‘पुढारी न्यूज’ चॅनेल पार्टनर होते. या कार्यक्रमाला रसिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
अजय-अतुल यांच्या जादुई स्वरांनी पारंपरिक संगीताला आधुनिक साज चढवणार्या त्यांच्या अनोख्या शैलीला कोल्हापूरकर रसिकांना अक्षरशः ‘याड’ लावले. ‘लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा’, ‘मल्हार वारी’, ‘चांगभलं रं देवा चांगलभ रं...’, ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं रं...’ म्हणत जोतिबाला केलेले आवाहन यातून त्यांनी रसिकांच्या भावनेला हात घातला. त्यानंतर ‘अप्सरा आली’, ‘वाजले की बारा’, ‘अभी मुझमें कही...’ या गाण्यांतून प्रेक्षकांना प्रेम रंगात न्हाऊन टाकले. अजय-अतुल यांच्या विविध सांगितिक प्रयोगाशी एकरूप होताना प्रेक्षकांनी अद्वितीय संगीत सोहळा याची देही याची डोळा अनुभवला. ‘अप्सरा आली’ने कार्यक्रमाला ग्लॅमरचा टच दिला. प्रकाशयोजनेने स्टेजवर रंगत आणली. ‘चंद्रमुखी’ या गाण्याने रोमँटिक वातावरण तयार केले.
पहिल्याच गाण्याला मिळालेल्या प्रतिसादावरून हे स्पष्ट झाले होते की, आजची रात्र ऐतिहासिक ठरणार आहे. अखेर ‘माऊली माऊली’च्या जोशपूर्ण पुनरावृत्तीनंतर हा संगीत सोहळा संपला अन् हे क्षण अजय-अतुल आणि कोल्हापूरकरांच्या मनात कायमचे कोरले गेले.अभिनेत्री अमृता खानविलकरच्या खुमासदार निवेदनाने कार्यक्रमात रंगत आणली. रीलस्टार डीपी ऊर्फ धनंजय पोवार यांनी त्यांना साथ दिली.
कार्यक्रमात शेवटाकडे जाताना खरी जादू झाली, जेव्हा अजय-अतुल यांनी त्यांच्या प्रसिद्ध ‘झिंगाट’चे सूर छेडले. मैदानाचा प्रत्येक कोपरा अक्षरशः हरखून गेला. हजारो कोल्हापूरकर एकाच वेळी थिरकू लागले. मोबाईलच्या फ्लॅशलाईटस् लखलखू लागल्या. टाळ्या, शिट्ट्या, जल्लोष आणि निखळ आनंदाने रसिक भारावून गेले. गाणं संपताच ‘वन्समोअर’ असा एकच जल्लोष झाला आणि अजय-अतुल यांनीही रसिकांचा मान राखला.
स्टेजच्या दोन्ही बाजूंना असलेली अजस्त्र साऊंड सिस्टीम ढोलाच्या बीटसोबत प्रेक्षकांच्या हृदयात थेट स्पंदने निर्माण करत होती. सुरुवातीला अनेक भक्तिरसपूर्ण गीतांनी वातावरण आध्यात्मिक झाले. स्टेजवरील प्रकाशयोजना, ढोल-ताशांचा गजर आणि तबला, ढोलकीच्या ठेक्यावर अजय-अतुल यांच्या वाद्यवृंदाने मैदानात वेगळाच माहोल तयार केला. डीजे बीटस् आणि ढोलकीच्या तालावर प्रेक्षक अक्षरशः बेभान झाले.