

कोल्हापूर : जिल्ह्यात ‘चला माती समजून घेऊया, शेती समृद्ध करूया’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून या उपक्रमांतर्गत ‘जागतिक मृदा दिवसा’निमित्त शुक्रवारी 300 गावांतील मातीचे नमुने घेतले जाणार आहेत. वर्षभरात 26 हजार शेतकर्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप केले जाणार आहे.
रासायनिक खते, पाण्याचा अतिरेकी वापर, पीक पद्धतीतील बदल, जमिनीतील पौष्टिक तत्त्व, सेंद्रिय खतांचा अभाव यामुळे मातीचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्याचा विपरीत परिणाम पीक उत्पादकतेवर होत आहे. यामुळे शेतीतील टिकाऊपणाला गंभीर धक्का बसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्यातून 2015-16 पासून मृद आरोग्य पत्रिका अभियान राबविण्यात येत आहे. यावर्षी त्याला अधिक व्यापक स्वरूप दिले जाणार आहे.
या पत्रिकेमुळे शेतकर्यांना मातीतील घटकांचे परीक्षण, संतुलित खत वापर, योग्य पीक पद्धती, शेतीतील खर्च नियंत्रण आणि उत्पादनवाढ याबाबत वैज्ञानिक मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. शेतकर्यांना माती परीक्षण करूनच खतांचा वापर करण्याचे, सेंद्रिय अन्नद्रव्यांचा पुरवठा वाढविण्याचे, पीक फेरपालट व जलसंधारण उपाय अवलंबण्याचे आणि मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांवरील अवलंबित्व टाळा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. गावांतील शालेय विद्यार्थ्यांत माती परीक्षणाचे महत्त्व समजावून सांगून भविष्यातील भावी पिढीतही शेतीबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.
माती परीक्षण का हवे?
माती परीक्षणामुळे जमिनीतील उपलब्ध घटकांचे प्रमाण समजते. त्यावर आधारीत पिकांच्या गरजेप्रमाणे आवश्यक तेवढेच खत दिल्यामुळे आर्थिक बचत होते. जमिनीच्या प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते. खतांचा संतुलित वापर केल्यामुळे पिकांची वाढ चांगली होऊन अधिक उत्पादन मिळते. जमिनीतील काही दोष असतील, तर तेदेखील समजतात आणि ते सुधारण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करता येतात.