

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर शहरात एकमेव असलेला पायमोजाचा वृक्ष पुन्हा बहरला आहे. याबाबतची माहिती वनस्पतीतज्ज्ञ डॉ. मकरंद ऐतवडे व उद्यान अधीक्षक जयेंद्र पानसरे यांनी दिली. पायमोजाचा हा वृक्ष मूळचा लॅटिन अमेरिकेतील पेरूमधील असून, व्हेनिझुएला, ब्राझील, साल्वाडोर या देशांतील नैसर्गिक जंगलांमध्ये 100 फुटांपेक्षाही जास्त उंच वाढतो. याचे शास्त्रीय नाव मायरोझायलॉन बालस्यामम असून, तो पळस कुळातील वृक्ष आहे. याला पेरू बाल्सम, टोलू बाल्सम अशी इंग्रजी नावे आहेत.
या झाडाच्या शेंगा पायमोजाच्या आकारासारख्या असल्याने यास ‘पायमोजाचे झाड’ असे मराठी नाव पडले आहे. या वृक्षाच्या खोडातील सुगंधी चिकट पदार्थाचा उपयोग त्वचारोगांवर आणि कफ सिरपमध्ये होतो. खोडापासून काढलेल्या सुगंधी तेलाचा वापर विविध सौंदर्यप्रसाधने, परफ्यूम व साबणात होतो. वृक्षाचे लाकूड हे खर्या महोगनीपेक्षाही गडद रंगाचे असते. लाकूड सहसा कुजत नसल्याने त्याचा उपयोग घरातील फर्निचरसाठी होतो.