

कोल्हापूर : चार दिवसांपासून पावसाने पूर्ण उघडीप घेतली आहे. पाऊस थांबताच झपाट्याने वाढलेल्या पंचगंगेच्या पाणी पातळीत घट झाली; मात्र गेल्या दोन दिवसांपासून पाणी पातळीत किंचित घट होत आहे. दिवसभरात पंचगंगेच्या पाणी पातळीत एक इंचाची घट झाली असून अद्याप राजाराम, रुई, इचलकरंजी, बाचणी हे चार बंधारे पाण्याखाली आहेत. शनिवारी दिवसभर पावसाची उघडीप होती.
पाऊस थांबल्याने शनिवारी शहरात दिवसभर आधूनमधून ढगाळ वातावरण व उन्हाचे चटके असे चित्र होते. दैनंदिन सरासरी कमाल तापमानात 1.8 अंशांची घट होऊन पारा 31.9 अंशांवर स्थिरावला होता. किमान तापमान 23.5 अंशांवर स्थिरावले होते. याशिवाय ढगाळ वातावरणामुळे सापेक्ष आर्द्रता 80 टक्क्यांवर होती. यामुळे दिवसभर चांगलाच उकाडा जाणवत होता. पंचगंगा नदीची पाणी पातळी शनिवारी सकाळी सात वाजता 16 फूट 6 इंचांवर होती. सकाळी दहा वाजता पातळी 16 फूट 5 इंचांवर आली व रात्री 10 वाजेपर्यंत ती 16 फूट 6 इंचांवर स्थिर होती. पुढील चार दिवस कोल्हापुरात ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.