

कोल्हापूर : राज्यातील कृषी व अकृषी विद्यापीठांकडे सुमारे 25 हजार एकरहून अधिक जमीन आहे. या जमिनीचा उपयोग कशा पद्धतीने करता येईल, यासाठी उच्चशिक्षण मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. शिवाजी विद्यापीठाने परिसरातील दोन एकर जमीन दिल्यास येत्या काळात रतन टाटा कौशल्य विकास केंद्र उभारू, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.
विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय रोेजगार मेळाव्यात ते बोलत होते. मंत्री सामंत म्हणाले, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत सेवा व उत्पादन क्षेत्रासाठी 35 टक्के सबसिडीसह अनुक्रमे 50 लाख व 1 कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. राज्याचे परदेशात 30 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत. त्यामुळे रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध होणार आहेत. प्रत्येक विद्यापीठाने जागा दिल्यास शासनातर्फे सुसज्ज व अद्यावत कौशल्य विकास केंद्र निश्चितपणे उभारता येईल, जेणेकरून स्थानिक पातळीवर युवक-युवतींना आवश्यक कौशल्ये प्रदान करता येतील.
कोल्हापुरात सहा महिन्यांत आयटी पार्क स्थापन होईल
कोल्हापुरातील आयटी पार्कचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. आगामी सहा महिन्यांत आयटी पार्क स्थापन होईल. यामुळेही कोल्हापूरच्या प्रगतीला हातभार लागणार असल्याचे मंत्री उदय सामंत म्हणाले.