कोल्हापूर : भारतीय संस्कृतीत उपवास करणे सामान्य बाब आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून महिला व पुरुष उपवास करतात. मात्र, महिला या सर्वाधिक उपवास करतात. एका संशोधनानुसार, उपवास करणाऱ्या ६० टक्के महिलांना रक्तक्षय होत असल्याचे आढळले आहे. उपवास करणाऱ्या बहुतांश महिलांना अशक्तपणा, हामर्मोन्स असंतुलन यामुळे गरोदरपणात निर्माण होणाऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो, याकडे वैद्यकीय तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
उपवासामुळे हार्मोन्सवर विपरीत परिणाम
मधुमेह, संधिवात, रक्तदाबाचीही समस्या
प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम
उपवास काळात पोषण आहाराकडे दुर्लक्ष
शरीरातील रक्ताची कमी लोह, जीवनसत्वे, प्रथिनांची घट, हार्मोन्समधील असंतुलन, अशक्तपणा, थकवा अशा अनेक व्याधींनी महिलांना ग्रासण्याचे प्रमुख कारण बनले आहे ते म्हणजे उपवास. महिन्यातील सरासरी २१ दिवस महिला उपवास करतात. २५ ते ७० वयोगटातील महिलांत उपवास करण्याचे वाढते प्रमाण आजारांना निमंत्रण देत आहे. प्रासंगिक, आठवडी एक तर कधी सलग उपवासामुळे महिलांचे आरोग्यचक्र बिघडत चालले आहे. सातत्याने उपवास करणाऱ्या महिलांपैकी ६० टक्के महिलांमध्ये रक्ताची कमतरता आढळत असून, आवश्यक संप्रेरकांच्या अनियंत्रणामुळे त्यांच्या प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम होत आहे.
सातत्याने उपवास करणाऱ्या महिलांच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण, रक्तातील लाल पेशींचे प्रमाण घटते. त्यामुळे रक्तक्षयाचा सामना करावा लागतो. महिलांच्या शरीरात होणारी विविध हार्मोन्सची निर्मिती व घट ही प्रक्रिया संतुलित आहारामुळे नियंत्रित होत असते. उपवासाच्या काळात हार्मोन्स संप्रेरक विस्कळीत होते. याचा प्रजनन प्रक्रियेतील इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन यांच्या संतुलनावर परिणाम होतो. रजोनिवृत्तीच्या काळात उपवासामुळे महिलांच्या आरोग्याची घडी विस्कळीत होते. सलग उपवासानंतर लगेच पूर्ववत नियमित आहार केल्यास आतड्याला पीळ पडतो.
राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणानुसार, उपवास करणाऱ्या महिलांपैकी ६० टक्के महिलांना रक्तक्षयाची समस्या निर्माण होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या संशोधनानुसार, उपवासकाळात बहुसंख्य महिला शाबुदाणा, शेंगदाणा, हिरवी मिरची, तळलेले पदार्थ, चहा यांचे सेवन करत असल्याने पित्तविकार होण्याचे प्रमाण वाढते. पचनाला जड पदार्थ खाल्ल्याने पोटाशी संबंधित आजार वाढतात.
आषाढ महिन्यातील शुक्रवार, मंगळवार, श्रावण महिन्यातील चार सोमवार, शुक्रवार, मंगळवार, हरतालिका, ऋषीचा उपवास, गौरी पूजनाचा उपवास, सलग नवरात्र, अष्टमीचा जागर, खंडेनवमी, नवरात्रीचा पहिला आणि नववा दिवसाचा उपवास, मार्गशीर्षातील चार गुरुवार, संक्रांतीचा ओवसा, महाशिवरात्री हे उपवास बहुतांशी महिला करतात. याशिवाय सोळा सोमवार व्रत, प्रदोष, संकष्टी, वैभवलक्ष्मी व्रत, कुलदेवीच्या वाराचा नियमित उपवास याची भर पडते.
उपवास करणाऱ्या महिलांचे शरीर पोषक घटकांच्या दृष्टीने कमकुवत होते. प्रजनन क्षमता क्षीण होते. महिलांमध्ये रक्ताची कमतरता त्यांच्या अन्य अवयवांवर परिणाम करते. महिलांची प्रजनन क्षमता क्षीण होण्यास सततचा उपवास कारणीभूत ठरतो. उपवास काळात आवश्यक असलेली फळे, सॅलेडसह किमान ३ लिटर द्रवपदार्थ महिलांकडून सेवन केले जात नाहीत.
- डॉ. मंजुळा पिशवीकर, स्त्री रोग व प्रसूतितज्ज्ञ