

कोल्हापूर : जिल्ह्यात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) करण्यात येणार आहे. याकरिता 80.91 टक्के मतदारांचे अर्थात 27 लाख 23 हजार मॅपिंग पूर्ण झाले आहे. उर्वरित मतदारांपैकी सुमारे 3 लाख 20 हजारांवर मतदार ‘रडार’वर आहेत. त्यांच्या माहितीत विसंगती आढळून येत असल्याने या मोहीमेत त्यांना पुरावे सादर करावे लागणार आहेत.
‘एसआयआर’साठी जिल्हा प्रशासनाने मतदारांच्या मॅपिंगची प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्ह्यात 26 मेपर्यंत 33 लाख 65 हजार 672 मतदारांची नोंद आहे. त्यापैकी 27 लाख 23 हजार 237 मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. अद्याप 6 लाख 42 हजार 435 मतदारांचे मॅपिंग झालेले नाही. एकूण मतदारांपैकी 3 लाख 29 हजार 575 मतदारांच्या माहिती विसंगती आहे. या मतदारांना प्रत्यक्ष मोहिमेत पुरावे सादर करावे लागणार आहेत.
गेल्या 20 वर्षांच्या कालावधीत मतदार याद्यांत मोठ्या प्रमाणात नावे समाविष्ट करणे व वगळणे या प्रक्रिया झाल्या आहेत. झपाट्याने झालेल्या शहरीकरणामुळे लोकसंख्येचे एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले असून, अनेक मतदारांनी नवीन ठिकाणी नाव नोंदवले असले तरी जुन्या ठिकाणचे नाव वगळलेले नाही; ज्यामुळे मतदार याद्यांमध्ये दुबार नावे वाढली असण्याची शक्यता आहे.
विसंगती, मॅपिंग न झालेल्यांना नोटीस देणार
प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यावर ज्या मतदारांची नावे जुन्या नोंदींशी जुळली नसतील किंवा जुळणीत त्रुटी असतील, अशा व्यक्तींना मतदान नोंदणी अधिकार्यांमार्फत नोटिसा पाठवल्या जाणार आहेत. अशा व्यक्तींच्या नावांची यादी संभाव्य कारणांसह स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहेत. या मतदारांनी सादर करावयाच्या कागदपत्रांची यादी गणना प्रपत्राच्या मागे देण्यात येणार आहे.
आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाही
निवडणूक आयोगाच्या 9 सप्टेंबर 2025 च्या आदेशानुसार आधार हे ओळख पुरावा म्हणून वापरले जात आहे. मात्र, ‘आधार अॅक्ट, 2026’च्या कलम 9 प्रमाणे आधारकार्ड हा नागरिकत्वाचा पुरावा मानला जाणार नाही, याची मतदारांनी नोंद घ्यावी, असे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.
असे आहे एस.आय.आर. वेळापत्रक
20 ते 29 जून - गणना अर्जांची छपाई, बीएलओ यांचे प्रशिक्षण
30 जून ते 29 जुलै - बीएलओ घरोघरी जाऊन गणना प्रपत्राचे वाटप करणार, भरलेले अर्ज परत घेणार
5 ऑगस्ट - प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध
5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर- प्रारूप यादीवर दावे व हरकती स्वीकारणार
3 ऑक्टोबर - प्राप्त दावे व हरकती निकालात काढल्या जाणार
7 ऑक्टोबर- अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार