

डॅनियल काळे
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली असून प्रचाराच्या शेवटच्या फेरीत मतदार आणि उमेदवारांमधील संवाद अधिकच स्पष्ट आणि थेट होत असल्याचे चित्र दिसत आहे. चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे एका मतदाराला चार मते देण्याचा अधिकार मिळाल्याने यंदाच्या निवडणुकीत ‘पॅनेल टू पॅनेल’ मतदानाऐवजी ‘सिंगल व्होटिंग’ हा शब्द प्रचंड चर्चेत आला आहे.
प्रभागांचे भौगोलिक क्षेत्रफळ वाढल्यामुळे मतदारसंघ मोठे झाले आहेत. परिणामी ‘आपल्या भागातील उमेदवारालाच मत’ देण्याची मानसिकता मतदारांमध्ये वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक उमेदवारांना प्रचारादरम्यान मतदारांकडून, ‘तुमच्यासाठी एक मत नक्की देऊ; उरलेली तीन मते आम्ही ठरवू’, असे थेट ऐकायला मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. चार सदस्यीय पद्धतीमुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असले तरी उमेदवारांच्या आणि पक्षांच्या गोटात मात्र चिंतेचे सावट आहे. प्रभाग विस्तारल्याने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना मोठी कसरत करावी लागत आहे. तरीही 15 जानेवारीपर्यंत थांबण्याचा प्रश्नच नसल्याने प्रत्येक उमेदवार पायाला भिंगरी बांधून प्रचारात धावताना दिसत आहे.
प्रत्येक प्रमुख पक्षाने चार उमेदवारांचे पॅनेल उभे केले आहे. पॅनेल टू पॅनेल मतदान झाले, तरच बहुमताचा आकडा गाठता येईल, असा पक्षांचा अंदाज आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी पॅनेललाच मतदान करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. सिंगल व्होटिंग किंवा क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी पक्षस्तरावरून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पण प्रत्यक्ष प्रचारात मात्र वेगळेच चित्र दिसून येत आहे. अनेक ठिकाणी उमेदवार स्वतःच ‘इथे बाकी मते पडणार नाहीत, आपल्यापुरते एक मत तरी नक्की ठेवा’, असा सूचक इशारा देत पुढे जात असल्याने यंदाच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, एका प्रभागातून वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार निवडून आले, तर निधी वाटप आणि विकासकामे करताना नेतृत्वाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळेच निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सिंगल व्होटिंग रोखण्यासाठी पक्षांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
नेत्यांसमोर खरी कसोटी...
चारसदस्यीय प्रभाग रचनेमुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत सिंगल व्होटिंग ही संकल्पना सर्वच राजकीय पक्षांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. पक्षनिष्ठ मतदारांकडून पॅनेलनुसार मतदानाची अपेक्षा असताना, प्रत्यक्षात मात्र मतदार आपल्या पसंतीच्या उमेदवारालाच मत देण्याकडे अधिक झुकताना दिसत आहेत. हीच बाब आता नेते आणि कार्यकर्त्यांसाठी खरी कसोटी ठरत आहे. प्रत्येक प्रभागात निर्माण झालेली टोकाची स्पर्धा,
अंतर्गत ईर्ष्या, तसेच काही उमेदवारांविषयी असलेले नकारात्मक वातावरण याचा थेट फटका संपूर्ण पॅनेलला बसू नये, याची चिंता पक्षनेतृत्वाला
सतावत आहे. अनेक ठिकाणी एका उमेदवाराविषयी असलेली नाराजी उरलेल्या उमेदवारांच्या मतांवरही परिणाम करू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.