तानाजी खोत
कोल्हापूर : सणासुदीच्या तोंडावर आणि गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय म्हणून ओळखल्या जाणार्या चांदीच्या दरात मोठी वाढ दिसून येत आहे. एकंदरीत, ही वाढ केवळ एका कारणामुळे नसून औद्योगिक क्रांती, आर्थिक अनिश्चितता आणि जागतिक घडामोडींचा एकत्रित परिणाम आहे. औद्योगिक क्षेत्रात, विशेषतः हरित ऊर्जेमध्ये (ग्रीन एनर्जी) चांदीची भूमिका दिवसेंदिवस महत्त्वाची होत असल्याने मागणीत वाढ होत आहे.
जागतिक बाजारात मंगळवार दि. 8 रोजी चांदीचा दर 48.9 डॉलर्स प्रतिऔंस इतका आहे. कोल्हापुरातील प्रतिकिलो चांदीचा दर 1 लाख 57 हजार 600 रुपये झाला आहे.
सौर पॅनल : सौरऊर्जा निर्मितीसाठी वापरल्या जाणार्या पॅनेलमध्ये चांदीचा वापर अत्यावश्यक असतो. जगभरात अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढत असल्याने सौर पॅनलची मागणी वाढली आहे, ज्यामुळे चांदीची मागणी आपोआप वाढली आहे.
इलेक्ट्रिक वाहने : इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्ये विविध इलेक्ट्रॉनिक घटकांसाठी चांदीचा वापर केला जातो. ईव्ही मार्केटच्या वाढत्या विस्तारामुळे चांदीची मागणी वाढत आहे.
तंत्रज्ञान : तंत्रज्ञानासाठी लागणार्या उपकरणांमध्येही चांदीचा वापर होतो.
गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय : जागतिक पातळीवर जेव्हा आर्थिक अनिश्चितता किंवा शेअर बाजारात अस्थिरता असते, तेव्हा गुंतवणूकदार आपले पैसे सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणे पसंत करतात. महागाईपासून संरक्षणासाठीही चांदीची खरेदी वाढली आहे.
जागतिक भूराजकीय तणाव : जगात सुरू असलेले युद्ध आणि विविध देशांमधील तणावाचे वातावरण यामुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत सुरक्षित मालमत्ता म्हणून चांदीच्या मागणीत वाढ झाली आहे, ज्यामुळे दरांवर दबाव येत आहे.
अमेरिकन डॉलरची स्थिती आणि व्याजदर : आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत अमेरिकन डॉलरमध्ये निश्चित होते. जेव्हा डॉलर कमकुवत होतो, तेव्हा इतर चलनांमध्ये चांदी खरेदी करणे स्वस्त होते, ज्यामुळे मागणी वाढते आणि भाव वाढतात.
पूर्वी कोल्हापूरमध्ये लग्नसराईच्या हंगामात चांदीचे, पैंजण, जोडवी, बांगड्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असे. शिवाय चांदीची पूजेची भांडी यांनाही मोठी मागणी होती; पण अलीकडे ग्राहक वाढत्या किमतीमुळे खरेदी पुढे ढकलत आहेत.
2025 मधील चांदीची एकूण मागणी सुमारे 1.16 अब्ज औंस .
इंडस्ट्रीयल वापर : 680.5 दशलक्ष औंस (सुमारे 60%)
दागिने : 208.7 दशलक्ष औंस (सुमारे 18%)
इतर चांदीच्या वस्तू, व गुंतवणूक : 272 दशलक्ष औंस 22 टक्के
2025 या वर्षात इंडस्ट्रीयल मागणीत सुमारे 3% वाढ, तर दागिन्यांच्या मागणीत 6% घट होण्याचा अंदाज आहे.
(सोर्स-वर्ल्ड सिल्व्हर सर्व्हे)