

कोल्हापूर : आपल्या नाजूक कलाकुसरीने संपूर्ण देशातील बाजारपेठ काबीज करणार्या कोल्हापुरी चांदीच्या पैंजणांचा छमछमाट चांदीच्या दरवाढीमुळे हरवून जात आहे. चांदी दराने प्रतिकिलो एक लाख 19 हजार 500 रुपयांचा टप्पा गाठला आहे. या तडाख्याने कोल्हापूर जिल्ह्यातील ‘चांदीचे माहेरघर’ म्हणून ओळखला जाणारा हुपरीतील पारंपरिक चांदी उद्योग आचके देऊ लागला आहे.
कोल्हापूर शहर तसेच हुपरीतील चांदी उद्योग हा प्रामुख्याने लहान कारखानदार आणि परंपरागत कुशल कारागिरांच्या जीवावर उभा आहे. मात्र, वाढलेल्या दरांमुळे कच्चा माल खरेदी करणे या कारखानदारांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. चांदी खरेदीसाठी जास्त भांडवलाची गरज असल्याने व्यवसायाचे गणित कोलमडले आहे.
एकीकडे दरांचा उच्चांक असताना दागिन्यांची मागणी 30 ते 40 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. सण-समारंभांसाठी हौसेने चांदी खरेदी करणारा सर्वसामान्य ग्राहक देखील कमी चांदी खरेदी करत आहे. चांदीच्या वापरापैकी तब्बल 55 टक्के वापर हा औद्योगिक क्षेत्रात होऊ लागला आहे. सोलर पॅनल, इलेक्ट्रिक वाहने आणि सेमी कंडक्टर चिप्समध्ये चांदीचा वापर वाढल्याने मागणी आणि पुरवठा यात मोठी तफावत निर्माण झाली आहे. हुपरीतील कारखानदार संजय माने म्हणाले, पूर्वी दहा किलो चांदी आणायला जे भांडवल लागायचं, त्यात आता पाच किलो मालही येत नाही. दुसरीकडे गिर्हाईक कमी झाले. कारागिरांना रोज काम कुठून द्यायचं? अनेकदा तर काम नसल्याने वर्कशॉप बंद ठेवावे लागते. यामुळे अनेक कुशल कामगार आता पोटापाण्यासाठी एमआयडीसीतील अन्य कारखान्यांकडे वळू लागले आहेत.
औद्योगिक वापर : 55% (सोलर, ईव्ही, इलेक्ट्रॉनिक्स)
दागिन्यांसाठी वापर : 20%
गुंतवणूक (नाणी/बार) : 15% चांदीची भांडी व इतर