

कोल्हापूर : मोपेडवरून जाताना भोवळ येऊन पडल्याने पिशवीतील सात लाख 10 हजार रुपये किमतीच्या चांदीच्या 98 मूर्ती चोरट्याने लंपास केल्या. ही घटना राधानगरी रोडवर रंकाळा पदपथ उद्यानाजवळ बुधवारी (दि. 24) सायंकाळी घडली. याप्रकरणी अनोळखी चोरट्याविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
महिपतराव बोंद्रेनगर परिसरात राहणारे सर्जेराव लव्हटे (36) हे चांदीच्या विविध मूर्ती तयार करणारे कारागीर आहेत. भेंडे गल्ली येथील सराफ व्यावसायिकाकडून त्यांनी मूर्ती तयार करून देण्याची ऑर्डर घेतली होती. 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी पिशवीतून मर्ती घेऊन ते मोपेडवरून संबंधित सराफ व्यावसायिकाकडे जात असतानाच क्रशर चौक - इराणी खणीपासून काही अंतरावर त्यांना भोवळ आली. मोपेडवरील ताबा सुटला. रंकाळा पदपथ उद्यानाच्या लोखंडी ग्रीलला ते धडकले. यावेळी मूर्ती असलेली पिशवी जमिनीवर पडली. ते सावरत असतानाच चोरट्याने रस्त्यावर पडलेली पिशवी उचलून धूम ठोकली. लव्हटे यांनी राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.