उद्योगांमध्ये चांदी वापर 9 टक्क्यांनी वाढला

Silver Use In Industries | सराफी क्षेत्रावर उद्योगांची मात
Silver Use In Industries |
अलीकडील काळात चांदीचा वापर औद्योगिक कारणासाठीदेखील होऊ लागला आहेFile Photo
Published on
Updated on
तानाजी खोत

कोल्हापूर : चांदीचा वापर पूर्वी केवळ दागिन्यांसाठीच केला जायचा. परंतु, अलीकडील काळात चांदीचा वापर औद्योगिक कारणासाठीदेखील होऊ लागला आहे. विश्वास बसणार नाही; परंतु सध्या तयार होणार्‍या चांदीपैकी निम्मी म्हणजे 50 टक्के चांदी औद्योगिक कारणासाठी वापरली जाते. यावर्षी तर या वापरात नऊ टक्क्यांनी वाढ झाली असून, औद्योगिक कारणासाठी चांदी वापर या पुढील काळातही वाढण्याची शक्यता असल्यामुळे त्याचा दरावरही परिणाम होणार आहे.

कोल्हापूर चांदीच्या दागिन्यांसाठी ओळखले जाते. हुपरी दागिनेनिर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, 2024 मध्ये चांदीचा निम्म्याहून अधिक वापर औद्योगिक क्षेत्रात सुरू झाला आहे. जागतिकस्तरावरील ‘सिल्व्हर इन्स्टिट्यूट आणि मनी मेटल एक्स्चेंज’च्या ताज्या अहवालानुसार, या वर्षाच्या अखेरपर्यंत जागतिकस्तरावर 19,842 मेट्रिक टन चांदीचा औद्योगिक वापर होणार असून, तो मागील वर्षाच्या तुलनेत 9 टक्क्यांनी अधिक आहे.

सौरऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांमध्ये सर्वाधिक वापर

सौर पॅनेल्ससाठी चांदी महत्त्वाचा घटक असून, 2027 पर्यंत सौर उद्योगामध्ये वार्षिक उत्पादनाच्या 20 टक्के चांदीचा वापर होण्याचा अंदाज आहे. इलेक्ट्रिक वाहनांची मागणी 55 टक्क्यांनी वाढणार असल्याने या उद्योगातही चांदीची मागणी वाढण्याचा अंदाज आहे.

चांदीचा औद्योगिक वापर का?

चांदीचे उत्कृष्ट विद्युत आणि उष्मा वाहक गुण, अँटिबॅक्टेरियल आणि उच्च प्रतिकारकशक्तीमुळे औद्योगिक वापर वाढला आहे. इलेक्ट्रॉनिक्स, सौर पॅनेल्स, इलेक्ट्रिक वाहन बॅटरी, वैद्यकीय उपकरणांत चांदी उपयुक्त आहे. या गुणधर्मांमुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये चांदीला मागणी आहे.

औद्योगिक मागणीमुळे तुटवडा

औद्योगिक मागणीत वाढ आणि पारंपरिक मागणीतील सातत्य यामुळे चालू वर्षात 5,156 मेट्रिक टन चांदीचा तुटवडा भासण्याचा अंदाज आहे. खाणींतून मिळणार्‍या चांदीच्या उत्पादनात केवळ 1% वाढ होते. परिणामी चांदीचे दर सतत वाढत आहेत.

हुपरी परिसरात चांदी हब

कोल्हापूरच्या हुपरी परिसरात चार पाच गावात सात ते आठ हजार छोटे मोठे चांदी प्रोसेसर्स आहेत. या ठिकाणी दररोज दोन ते तीन हजार किलो चांदीवर प्रक्रिया होते. वर्षाकाठी 80 ते 100 मेट्रीक टन चांदीची येथे प्रक्रिया होत असावी असा प्राथमिक अंदाज आहे. सुमारे 20 हजार कामगार या उद्योगात काम करतात. हा उद्योग वर्षाला 200 कोटी रुपयांचा कर भरतो. प्रत्येक कारखानदार स्वतंत्र चांदी खरेदी करत असल्याने अचुक अंदाज बांधणे कठीण आहे.

चांदीच्या औद्योगिक वापराचे महत्त्वाचे टप्पे

कालखंड प्रमुख उपयोग

प्राचीन काळः नाणी, दागिने, आणि धार्मिक वस्तू तयार करण्यासाठी रौप्याचा उपयोग.

19वे शतकः छायाचित्रण (फोटोग्राफी) आणि प्राथमिक विद्युत उपकरणांसाठी रौप्याचा वापर.

20वे शतकः फोटोग्राफी, इलेक्ट्रॉनिक्स, आणि बॅटरीसाठी रौप्याचा मोठ्या प्रमाणावर वापर.

21वे शतकः इलेक्ट्रॉनिक्स, सौर ऊर्जा (सोलर पॅनल्स), औषधे आणि वैद्यकीय उपकरणे, आणि तांत्रिक क्षेत्रांमध्ये उपयोग

कोल्हापूरमध्ये चांदीपासून दागिने, भांडी, देवदेवतांच्या मूर्ती तयार केल्या जातात. चांदीचा औद्योगिक वापर वाढत असल्यामुळे त्याचा दरावर परिणाम होत आहे. आपल्याकडे मात्र चांदीचा सर्वाधिक वापर दागिन्यांसाठीच होतो.
- राजेश राठोड, अध्यक्ष, कोल्हापूर सराफ व्यापारी संघ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news