Sugar Season | साखर हंगामात उत्पादन वाढीचे संकेत!

‘इस्मा’ने जाहीर केला पहिला अंदाज : उत्पादन 349 लाख मेट्रिक टन अपेक्षित
Signs of increased production in the sugar season
Sugar Season | साखर हंगामात उत्पादन वाढीचे संकेत!Pudhari File Photo
Published on
Updated on

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : सलग दोन वर्षांत उत्पादनात घसरण नोंदविल्यानंतर आगामी भारतीय गळीत हंगामात साखर उत्पादनाचा आलेख उंचावण्याचे संकेत मिळाले आहेत. देशात उसाच्या लागवड क्षेत्रात झालेली वाढ, उसाच्या वाढीला सर्वत्र पोषक असलेल्या समाधानकारक पावसामुळे आगामी हंगामात साखरेचे एकूण उत्पादन 349 लाख मेट्रिक टनावर पोहोचेल, असा प्राथमिक अंदाज भारतीय साखर कारखानदारांच्या संघटनेने (इस्मा) वर्तवला आहे. यामध्ये साखरेचे उत्पादन तर वाढेलच; पण इथेनॉलकडे वळविल्या जाणार्‍या साखरेचा हिस्साही वाढविला जाईल, असा अंदाज आहे. यामुळे देशात साखरेचे भाव आगामी काळात स्थिर राहतील. शिवाय, शासनाने धान्यापासून इथेनॉल निर्मितीला परवानगी देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतल्यामुळे पेट्रोलमधील 30 टक्के इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रमही सुसाट वेगाने पुढे जाईल, असे चित्र आहे.

देशात साखरेच्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी तीन महिने अगोदर उपग्रहाद्वारे छायाचित्रे घेऊन उत्पादनाचा अंदाज बांधण्याची पद्धत आहे. यानुसार गतहंगामापूर्वी देशात 57 लाख 10 हजार हेक्टरवर ऊस गाळपासाठी सज्ज होता. नुकत्याच घेतलेल्या छायाचित्रामध्ये हे लागवड क्षेत्र 57 लाख 20 हजार हेक्टरवर गेले आहे. यामध्ये महाराष्ट्र व कर्नाटकातील लागवड क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेने अनुक्रमे 8 व 6 टक्क्यांनी वाढले आहेत. उपग्रहाच्या छायाचित्राच्या आधारे या दोन प्रमुख ऊस उत्पादक राज्यांमध्ये आगामी हंगामात गाळपासाठी अनुक्रमे 14 लाख 90 हजार हेक्टर व 6लाख 70 हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस उभा आहे. याउलट गतवर्षी आघाडीवर असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये मात्र लागवड क्षेत्र 3 टक्क्यांनी घसरले आहे. लागवड क्षेत्राच्या वाढीला देशात सर्वव्यापी सक्रिय झालेला मान्सून आधारभूत ठरतो आहे. शिवाय, भारतीय हवामान खात्याने ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यांत सरासरीपेक्षा अधिक पर्जन्याचे वर्तमान केले आहे.

उसाच्या लागवड क्षेत्रावरून ‘इस्मा’ने वर्तविलेला अंदाज हा प्राथमिक स्वरूपाचा आणि पहिला अंदाज म्हणून ओळखला जातो. या काळात उसाचे पीक प्रथमावस्थेत असते. याचदरम्यान उसाला किडीचा प्रादुर्भाव जाणवतो. पर्जन्य अधिक झाले, तर उसाची नैसर्गिक वाढ थांबून कृत्रिम वाढ सुरू होते. साखरेचा उतारा घसरतो. पर्जन्य लांबले तर हंगाम लांबतो. त्याचाही पुन्हा उत्पादनावर परिणाम होतो. साखर उत्पादनावर परिणाम करणारी ही महत्त्वाची कारणे आहेत. सध्या तरी किडीच्या प्रादुर्भावाची वार्ता साखरेच्या शिवारात नाही. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन प्रमुख साखर उत्पादक राज्यांमध्ये पर्जन्य समाधानकारक असताना गंभीर पूर स्थिती अद्याप कोठेही नाही. यामुळे या प्राथमिक अंदाजाच्या संकेताला धरून पुढे जाण्यास हरकत नाही, अशी सध्याची स्थिती आहे.

कारखानदारीसाठी शुभवर्तमान

गतहंगामात देशांतर्गत साखरेचा वापर 291 लाख मेट्रिक टनावर गेला होता. त्यामुळे देशांतर्गत गरज भागविण्यासाठी हंगामपूर्व शिल्लक साठ्याचा वापर करणे अनिवार्य झाले. यंदा केंद्राच्या धोरणाला अनुसरून 50 लाख टन साखर इथेनॉल निर्मितीकडे वळली, तरी बाजारात 300 लाख टन साखर वापरासाठी उपलब्ध होऊ शकते. 2025-26 या साखर वर्षात देशांतर्गत साखरेचा वापर 279 लाख टन अपेक्षित असल्याने यंदा देशांतर्गत गरज भागविण्यासाठी शिल्लक साठ्याचा वापर करण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे कारखानदारीसाठी हे शुभवर्तमान आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news