

कोल्हापूर : मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त लावलेल्या साऊंड सिस्टीमवरून दुपारी झालेल्या वादातून दोन समाजात शुक्रवारी रात्री दंगल झाली. सिद्धार्थनगर - राजेबागस्वार परिसरात दगडफेक, तोडफोड करत वाहने जाळण्यात आली. पोलिसांनी लाठीमार करत जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, उशिरापर्यंत दोन्ही बाजूंनी जमाव आक्रमक होता. यामध्ये पोलिसांसह दहाजण जखमी झाले.
भारत तरुण मंडळ प्रणीत राजेबागस्वार फुटबॉल क्लबचा शुक्रवारी वर्धापनदिन होता. यानिमित्ताने दुपारी साऊंड सिस्टीम लावली होती. ती सिद्धार्थनगर येथील स्वागत कमानीजवळ लावल्याने पूर्ण रस्ता व्यापला होता. यामुळे सिद्धार्थ नगरमधील काही नागरिकांनी पोलिसांकडे याबाबत विचारणा केली. त्यानंतर पोलिसांनी ही साऊंड सिस्टीम बंद करायला लावली. रात्री पावणेदहाच्या सुमारास सिद्धार्थनगरात एक तरुणांचा जमाव शिरला. या जमावाने दिसेल त्या वाहनांची तोडफोड सुरू केली. मालवाहतूक रिक्षा, टेम्पो जमावाने उलटून टाकले. त्यात पेट्रोल ओतून ते पेटवून देण्यात आले. यामुळे परिसरात गोंधळ उडाला. प्रारंभी कोणालाच काय झाले ते समजत नव्हते. मात्र, समोरच्या बाजूने हल्ला होत असल्याचे समजातच सिद्धार्थनगर परिसरातील महिला, तरुण सर्वच घराबाहेर पडले, त्यांनी जमावावर चाल केली. यावेळी जमाव पसार झाला.
दरम्यान, सिद्धार्थनगरच्या दिशेने पेट्रोल भरलेल्या दोन बाटल्या फेकण्यात आल्या. याच दरम्यान सिद्धार्थनगर कमानीसमोरील निळा ध्वज फाडल्याचे लक्षात येताच जमाव आक्रमक झाला. जमावाने समोरच्या बाजूला उभ्या असलेल्या जमावावर दगडफेक सुरू केली. यानंतर दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाली. या परिसरात काही काळ धुमश्चक्रीच उडाली. या परिसरातील काही फलकही फाडण्यात आले. दोन्ही बाजूचा जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. सीपीआर चौकातून तोरस्कर चौक, शिवाजी पुलाकडे जाणार्या नागरिकांना, वाहनधारकांनाही काही समजत नव्हते. त्यांचीही धावपळ उडाली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलिस घटनास्थळी आले. परिस्थितीची भीषणता लक्षात येताच जादा कुमक मागवण्यात आली. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. मात्र, दोन्ही बाजूंनी आक्रमक झालेल्या जमावाला नियंत्रण करताना पोलिसांची प्रचंड दमछाक होत होती. यानंतर पोलिसांच्या अनेक तुकड्या दाखल झाल्या. अपर पोलिस अधीक्षक धीरजकुमार बच्चू, शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, पोलिस उपअधीक्षक महेश सावंत आदींसह शहरातील सर्व पोलिस ठाण्यांचे निरीक्षक, अन्य विभागाचे निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल होताच दोन्ही बाजूच्या जमावाला नियंत्रणात आणण्यात काही प्रमाणात यश आले. यानंतर दोन्ही बाजूला जमाव थांबून होता. संबंधितांवर कारवाई झाल्याखेरीज घरी जाणार नाही, हल्लेखोरांना आमच्यासमोर आणा, निळा ध्वज पाडणार्याला समोर आणा, अशी आक्रमक मागणी जमाव करत होता. त्यातून काहीजण पुन्हा दुसर्या जमावावर धावून जाण्याचा प्रयत्न करत होते. दुसरीकडे थांबलेल्या जमावाला पोलिस घरात परत जाण्यास भाग पाडत होते. मात्र, दोन्ही जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. दरम्यान, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ताही घटनास्थळी आले. जमावाने कमानीसमोर झेंडा पुन्हा लावण्याची विनंती केली, त्यावर पोलिसांसोबत काही तरुणांनी जाऊन हा झेंडा लावला. यानंतर जमाव काहीसा शांत झाला. संबंधित सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिल्यानंतर जमाव मागे हटण्यास तयार झाला. तरीही रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूचा जमाव आणि मध्यभागी पोलिसांचा फौजफाटा असे चित्र होते. या दगडफेक, तोडफोडीत पोलिस कर्मचार्यांसह दहाजण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यांची नावे सांगण्यास नकार देण्यात आला. एक जखमी पोलिस रक्तबंबाळ अवस्थेतील हाताला रुमाल बांधून जमावाला शांत करत होता. दगडफेकीदरम्यान दगड लागून तिघेजण किरकोळ जखमी झाले तर यावेळी झालेल्या पळापळीत गटारीत दोघेजण पडून त्यांच्या हाताला व पायाला जखम झाली.
परिसरात धुमश्चक्री सुरू असताना पोलिस आले. यानंतर काही वेळात परिसरातील स्ट्रीट लाईटवरील वीज पुरवठा खंडीत झाला. यामुळे चौकातील हायमास्ट वगळता सर्व परिसरात अंधार पसरला होता. त्यातही दोन्ही बाजूने दगडफेक सुरू होती.
सीपीआर चौक व तोरस्कर चौकात पोलिसांनी शिवाजी पूल आणि दसरा चौकाकडे जाणारी सर्व वाहतूक बॅरिकेडिंग लावून वाहतूक बंद करण्यात आली. पोलिस सिद्धार्थनगरकडे कोणालाही जाऊ देत नव्हते. दरम्यान सीपीआर चौकातही बघ्यांची गर्दी जमली होती. त्यात प्रचंड पोलिस बंदोबस्त असल्याने सीपीआर चौकातील वातावरणही तणावपूर्ण बनले होते.
या दगडफेकीत पेट्रोल असलेल्या दोन बाटल्या फेकण्यात आल्याचा आरोप यावेळी सिद्धार्थनगरातील नागरिकांनी केला. हा हल्ला पूर्वनियोजितच होता. हल्ला करताना असणारा जमाव मोठा होता. त्यामुळे बाहेरूनही लोक आले असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला.
दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली. यामुळे या संपूर्ण परिसरात दगड, विटांचा अक्षरश: खच पडला होता. दगडफेक, त्यानंतर पळापळ यामुळे या परिसरात चप्पल, बूटही मोठ्या प्रमाणात पडले होते.
सिद्धार्थनगर परिसरात लावलेल्या वाहनांची हल्लेखोरांनी तोडफोड केली दिसेल त्या वाहनावर मोठे दगड टाकले. काही वाहने उलटवली. त्यामध्ये मालवाहतूक करणार्या रिक्षा, टेम्पोसह 10 हून अधिक चारचाकी व दुचाकी वाहनांची तोडफोड केली.
या दंगलीत राजेबागस्वार परिसरातील दगडफेकीत जखमी झालेल्यापैकी 5 जणांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. यामध्ये एका 82 वर्षीय वृद्धाचाही समावेश आहे. सिद्धार्थनगरपरिसरातीलही काहीजण जखमी झाले.
या दंगल सुरू असताना दोन्ही बाजूचा जमाव आक्रमक झाला होता. यामध्ये महिलाही अग्रभागी होत्या. पोलिसाकडे महिला कर्मचारी तुलनेने कमी असल्याने या जमावातील महिलांना रोखताना पोलिसांना प्रचंड कसरत करावी लागली.
सिद्धार्थनगरात तोडफोड आणि दगडफेक झाल्यानंतर आक्रमक झालेला जमाव राजेबागस्वार परिसराच्या दिशेने चालून गेला. जमावानेही जोरदार दगडफेक केली. हल्ला आणि प्रतिहल्ल्यामुळे प्रचंड तणाव झाला होता.