Maharashtra shrimp export | कोळंबीची सातासमुद्रापार मोहिनी; निर्यातीत महाराष्ट्र दुसर्‍या स्थानी!

पाच वर्षांत निर्यात दुप्पट; 7 हजार कोटींच्या उलाढालीसह ‘ब्लू रिव्होल्युशन’कडे झेप
Maharashtra shrimp export |
Maharashtra shrimp export | कोळंबीची सातासमुद्रापार मोहिनी; निर्यातीत महाराष्ट्र दुसर्‍या स्थानी!
Published on
Updated on

आशिष शिंदे

कोल्हापूर : भारताच्या नील क्रांतीमध्ये (ब्लू रिव्हॉल्युशन) महाराष्ट्राने आपले महत्त्वाचे स्थान पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात राज्याने तब्बल 7 हजार 343 कोटी 40 लाख रुपयांच्या समुद्री उत्पादनांची निर्यात केली आहे. केंद्र सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राच्या मत्स्य निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. 2020-21 मध्ये 3 हजार 684 कोटी असणारी ही निर्यात आता दुप्पट झाली असून, निर्यातीच्या परिमाणातही मोठी वाढ होऊन ती वार्षिक 2.27 लाख मेट्रिक टन वर पोहोचली आहे. राज्यातील कोकण किनारपट्टीवरील मत्स्यव्यवसाय या जागतिक मागणीचा मोठा हिस्सा पूर्ण करत असून मत्स्य निर्यातीत महाराष्ट्र देशात दुसर्‍या स्थानी झेप घेतली आहे.

राज्यातून होणार्‍या या मत्स्य निर्यातीत कोळंबी आणि गोठवलेल्या मासळीचा मोठा वाटा असून, अमेरिका आणि चीन यांसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये महाराष्ट्रातील उत्पादनांना मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चढ-उतार आणि वाढता उत्पादन खर्च यांसारखी आव्हाने असूनही, महाराष्ट्राने गुजरात आणि आंध— प्रदेश या राज्यांच्या बरोबरीने आपले स्थान कायम राखले आहे. भारताच्या एकूण निर्यातीत अमेरिका (22,723 कोटी) आणि युरोपियन युनियन (9,429 कोटी) या प्रमुख बाजारपेठा आहेत.

देशभरातून अमेरिकेला 22723 कोटींची मत्स्य उत्पादनांची निर्यात

भारतीय मत्स्य उत्पादनांसाठी अमेरिका ही सर्वात मोठी आणि फायदेशीर बाजारपेठ आहे. 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये अमेरिकेला 22 हजार 723 कोटी रुपयांच्या मत्स्य उत्पादनांची निर्यात झाली आहे. चीनने 3.96 लाख मेट्रिक टनांसह आघाडी घेतली आहे, ज्याचे मूल्य 10 हजार 668 कोटी रुपये इतके आहे. याव्यतिरिक्त युरोपियन युनियन (9,429.6 कोटी), दक्षिण-पूर्व आशिया (8,172.2 कोटी) आणि जपान (3,452.9 कोटी) या देशांमध्येही भारतीय मासळीला मोठी मागणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news