

कोल्हापूर: धर्मजागरण ट्रस्ट तर्फे श्री रेणुका माता दर्शन रथयात्रा शुक्रवार दि. 20 डिसेंबर ते रविवार दि. 29 या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्व भागात आयोजित करण्यात आली आहे. या रथयात्रेचा शुभारंभ आज शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातून होणार आहे अशी माहिती सनतकुमार दायमा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री रेणुका मातेचे भक्त जिल्ह्याच्या सर्व भागात आहेत. सौंदत्तीच्या डोंगरावर रेणुका मातेची यात्रा होते. अनेक भक्तांना इच्छा असूनही यात्रेमध्ये सहभागी होता येत नाही. अशा भक्तांसाठी धर्म जागरण ट्रस्टने रेणुका माता दर्शन रथयात्रेचे आयोजन केले आहे. यात्रेमध्ये असणार्या रथात देवीची अलंकारिक वस्त्रे, टाक आणि तीर्थाचा कलश असणार आहे. यात्रेच्या मार्गावरील नियोजित वस्त्यांमध्ये भाविकांना मनोभावे रथाचे पूजन करता येईल. रथयात्रेचा समारोप इचलकरंजी मधील खवरे मैदानावर रविवारी दि. 29 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. तत्पूर्वी दुपारी तीन वाजता कलश यात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी प.पू. काडसिद्धेश्वर स्वामी, प.पू.ह.भ.प. शिरीष महाराज मोरे, प.पू. बाळ महाराज, प.पू.दादा महाराज, यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पत्रकार परिषदेला रथयात्रेचे जिल्हा संयोजक चंद्रकांत शिंदे, सहसंयोजक संतोष पाटील, बापू वायंगणकर, सनतकुमार दायमा, प्रमोद पावले, प्रणव रजपूत, मनोज जाधव, रवी मिसाळ, प्रणव भिवसे, माधव कुंभोजकर, संभाजी गुरव, लखन पोवार आदी उपस्थित होते.