

वारणानगर : येथील वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे संस्थापक सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांना फलटण येथील श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला. तो वारणा सहकार समूहाचे प्रमुख आ. डॉ. विनय कोरे यांनी स्वीकारला.
फलटण येथे श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेच्या वतीने बँकेचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत शिवाजीराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रेरणेने देण्यात येणारा 2024-25 चा श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते तो देण्यात आला. अध्यक्षस्थानी पिंपरी- चिंचवड बँकेचे अध्यक्ष शिरीष देशपांडे होते. बँकेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर यांनी स्वागत केले. विनय कोरे यांनी तात्यासाहेब कोरे यांचे कार्य पुढे चालू ठेवल्यानेच ‘वारणा’ची ख्याती देशभर पसरली असल्याचे रामराजे निंबाळकर म्हणाले.
तात्यासाहेब कोरे यांनी फोंड्या माळावर साखर कारखान्यापासून अनेक संस्था स्थापन केल्याने वारणा परिसर सुजलाम् - सुफलाम् झाला. वारणेतील आदर्श घेऊन राज्यात संस्था उभारल्या. याचे श्रेय तात्यासाहेब कोरे यांना जाते, असे विनय कोरे म्हणाले. गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, योगिनी पोकळे, अनिकेत नाईक- निंबाळकर, मोहनराव नाईक- निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, प्राचार्य विश्वास देशमुख, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, राजेश लड्डा आदी उपस्थित होते.