कोल्हापूर : महापुरात सर्वसामान्य जनतेला घरे बांधून देण्यासाठी व वळिवडे गावाचा विकास करण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी गाव दत्तक घेतले होते. प्रत्यक्षात त्या ठिकाणी महापुरातील जनतेला त्यांनी वार्यावर सोडून कोणताही विकास केला नाही. अशा विद्यमान आमदारांना वळिवडे गावातील जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांनी येथील सभेत केले.
ही सभा आता ऋतू बदलणारी व वारं फिरल्याची प्रतीक ठरली आहे, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. आपल्या भाषणाच्या प्रारंभीच शौमिका महाडिक यांनी या सभेला ज्येष्ठ नागरिकांपासून ते माता-भगिनी आणि पहिल्यांदाच मतदार नोंदवणारे नवयुवक अशा तीन पिढ्यांतील मतदारांची प्रचंड उपस्थिती असल्यामुळे ही सभा निर्धार सभा न होता अमल महाडिक यांच्या विजयाची सभा असल्याचे संकेतही त्यांनी टाळ्याच्या गजरात दिले.
सुलोचना नार्वेकर यांनी कोरोना तसेच पुरावेळी निव्वळ कागदोपत्री गाव दत्तक घेतल्याची घोषणा न करता घरोघरी जाऊन पोत्याने धान्य देणार्या महाडिक परिवाराचे आणि भाजपचे ऋण पुन्हा एकदा अमल महाडिक यांना आमदार करून मतदार व्यक्त करतील, असा विश्वास व्यक्त केला. संदीप कुसळे यांनी नव्या बदलाचे वेध असणारे नवयुवक मतदार हे कमळाचे बटण दाबतील, असे ठामपणे नमूद केले.
मध्य प्रदेश उपमुख्यमंत्री जगदीशजी देवडा, माजी सरपंच अनिल पंढरे, ग्रामपंचायत सदस्या मेघा विक्रम मोहिते, अनिता उदय पाटील, राधिका महेश मोरे, स्वाती सचिन इंगवले, वंदना सचिन जाधव, गौरी रोहन पोवार, माजी जि. प. सदस्य महेश चौगुले, स्वाभिमानी संघटनेचे जनार्दन पाटील, रावसाहेब दिगंबरे, संजय चौगुले, बाळासाहेब पोवार, उदय पोवार, जितेंद्र कुसाळे, संदीप पोवार, धनश्री शिंदे, शिरोली सरपंच पद्मजा करपे, मीनाक्षी महाडिक यांच्यासह पंचक्रोशीतील कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.