

कसबा बावडा : लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचा जीवनपट आता लघुपटांच्या माध्यमातून उलगडणार आहे. शाहू जन्मस्थळी याकरिता तीस आसन क्षमतेचे थिएटर उभारण्यात आले आहे, येत्या गुरुवारी (दि. 26) शाहू जयंतीदिनी त्याचे लोकापर्ण होणार आहे.
शाहू जन्मस्थळाचा विकास केला जात आहे. त्याच्या दुसर्या टप्प्यातील 4.82 कोटींची कामे सुरू करण्यात आली आहेत. दुसर्या टप्प्यात राजर्षी शाहूंच्या घोड्यांची बग्गी, डॉक्युमेंटरी, शॉर्टफिल्म, होलोग्रफिक शो, शाहू महाराजांनी सामाजिक, कृषी, औद्योगिक, कला, क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी दिलेल्या योगदानातील ठळक प्रसंगांचे तैलचित्रे तयार करण्यात येणार आहेत. यासह छायाचित्र आणि शोकेसचेही काम केले जात आहे. दुसर्या टप्प्यातील अनेक कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. ही सर्व कामे 15 सप्टेंबरअखेर पूर्ण करा, असे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
राजर्षी शाहूंचे अनेक क्षेत्रांत अपूर्व असे काम आहे. प्रजेच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले, ते कृतीत आणून आपल्या संस्थानातच नव्हे, तर संपूर्ण देशभरात त्याचा आदर्श निर्माण केला. राजर्षी शाहूंचे जीवन हे अशा अनेक क्रांतिकारी घटनांनी, कृत्यांनी भारावलेले आणि आजही प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या जीवनातील अनेक घटना आता माहितीपट आणि लघुपटांच्या माध्यमातून शाहू जन्मस्थळी येणार्या नागरिकांना पाहता येणार आहेत. याकरिता इतिहास संशोधक आणि अभ्यासक यांच्या मार्गदर्शनाखाली विषय निश्चित केले आहेत. त्यापैकी चार लघुपट तयार झाले आहेत. हे लघुपट, माहितीपट दाखवण्यासाठी शाहू जन्मस्थळी 30 आसन क्षमतेचे थिएटरही उभारले आहे.