

कोल्हापूर : मार्केट यार्ड येथील गुळाचे होलसेल व्यापारी अरुण शंकरराव चौगुले यांचे अडत दुकान फोडून चोरट्याने केबिनमधील कपाटातून 60 लाखांची रोकड लंपास केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. माहीतगाराने पाळत ठेवून चोरी केल्याचा संशय आहे.
पोलिसांनी मार्केट यार्डसह परिसर तसेच महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. चोरीचा छडा लावण्यात यंत्रणेला यश येईल, असा विश्वास अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू यांनी व्यक्त केला. घटनास्थळी श्वानपथक, ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गुरुवारी सायंकाळी ते शुक्रवारी पहाटे या दरम्यान चोरट्याने दुकानाच्या मागील बाजूस असलेले खिडकीचे गज कापून प्रवेश केला. आतील बाजूस असलेल्या केबिनच्या दरवाजाचा कडी-कोयंडा कटावणीने उचकटून 60 लाखांची रोकड लंपास केली. शुक्रवारी सकाळी हा प्रकार निदर्शनास आला. अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार, पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर, शाहूपुरीचे निरीक्षक संतोष डोके, सहायक निरीक्षक क्रांती पाटील आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. विशेष पथकाने दुकानात काम करणार्या पाच कामगारांकडे चौकशी केली. माहीतगार आणि सराईत चोरट्याने चोरी केली असावी, असा संशय पोलिस अधिकार्यांनी व्यक्त केला.
मार्केट यार्डातील अडत दुकानात चोरट्याने 60 लाखाच्या रकमेवर डल्ला मारल्याची बातमी वार्यासारखी पसरताच मार्केट यार्डातील व्यापार्यांनी घटनास्थळी गर्दी केली. संशयिताचा लवकरच छडा लागेल, असे पोलिस निरीक्षक डोके यांनी सांगितले