

Kolhapur Land Compensation Fraud
नागाव : रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला हडप केल्या प्रकरणी विचारणा केली असता सख्ख्या भावाने जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शिये (ता. करवीर) येथे घडली आहे.
पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की, आरोपी शशिकांत रघुनाथ पाटील ( वय ६९) व फिर्यादी सुभाष रघुनाथ पाटील (वय ५६ दोघेही रा. शिये, ता. करवीर) हे सख्खे भाऊ असून त्यांची शिये येथील गट नं. १९८/१० मधील जमिनीचे काही क्षेत्र कोल्हापूर -रत्नागिरी महामार्गासाठी संपादीत केली व संपादीत क्षेत्राच्या मोबदल्या पोटी त्यांना ३२ लाख रूपये इतकी रक्कम मंजूर झाली होती. यामध्ये दोघा भावांची वाटणी असताना मात्र, आरोपी शशिकांत पाटील याने मोठ्या विश्वासाने करारावर सह्या घेतल्या आणि सर्व रक्कम स्वतःकडे ठेवून घेतली. जेव्हा सुभाष पाटील यांनी त्यांच्या हिश्याची मागणी केली, तेव्हा शशिकांत पाटील याने ती देण्यास नकार दिला.
सुमारे ३२ लाख रूपयांमधील आपल्या वाटणीचे पैसे मागितले असता शशिकांत पाटील याने सुभाष पाटील यास शिवीगाळ करत मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सुभाष पाटील यांनी कोल्हापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (कोर्ट नं. १३) यांच्याकडे दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार (कलम १७५(३) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता) आता शिरोली एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.