

कोल्हापूर : धनगरी ढोल आणि लेझीम.. हलगीच्या कडकडाटावर भिरभिरणारी लाठी आणि सळसळणारी तलवार.. गजराजावर विराजमान युगपुरुष शिवराय....सोबतच बाल शिवाजी, जिजाऊ अन् घोडेस्वार मावळे आणि शिवरायांचा अखंड जयघोष.. अशा ऐतिहासिक वातावरणात शुक्रवारी शहरात शिवकाळ अवतरला. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मराठा महासंघाच्यावतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीची भव्यता अनुभवत मार्गावर दुतर्फा नागरिकांची गर्दी झाली होती. मोबाईलच्या कॅमेर्यात मिरवणुक टिपत, अनेकजण सेल्फीही घेत होते. संपूर्ण मार्गावर छत्रपती शिवरायांचा जयघोष सुरू होता. मिरवणुकीतील छत्रपतींच्या इतिहासासोबतच ताराराणींचा पराक्रम, शाहू काळातील निर्णय व सध्याचा ज्वलंत सीमाप्रश्न, प्रलंबित प्रश्न, प्रदूषण अशा विषयांवरील समाजप्रबोधनात्मक लक्षवेधी फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.
मंगळवार पेठेतील मराठा महासंघाच्या कार्यालयापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते, आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी स्वागत केले. यावेळी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, अॅड. धनंजय पठाडे, अशोक भंडारे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेनेचे किशोर घाटगे, मल्हार सेनेचे बबन रानगे उपस्थित होते. मिरवणूक मिरजकर तिकटीमार्गे बिनखांबी मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक आली. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, प्रकाश पाटील, संजय पवार-वाईकर आदी उपस्थित होते.
धनगरी ढोल, त्यामागे हत्तीवर विराजमान छत्रपती शिवाजी महाराज, त्यामागे महिलांचे लेझीम पथक, त्यामागे शिवकालीन युध्दकलेची प्रात्यक्षिक करणारे शिवप्रेमी, त्यामागे राजमाता जिजाऊ, बाल शिवाजी, मावळे यांच्या वेशभूषेतील घोडेस्वार आणि छत्रपती शिवरायांची सिहासनावर आरूढ झालेली मूर्ती अशी आकर्षक मिरवणूक शहरातून निघाली.